रत्नागिरी प्रतिनिधी : राष्ट्र सेविका समिती या देश-विदेशात कार्यरत असलेल्या महिला संघटनेला आगामी विजयादशमी २०२६ रोजी ९० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर, आज आश्विन शुद्ध तृतीया (१३ ऑक्टोबर) रोजी रत्नागिरीत ‘नारायणी पठण मंडळ’, ‘स्वानंद पठण मंडळ’ आणि ‘रेणुका प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्री दुर्गा सप्तशती’ सामूहिक पठण सोहळा अतिशय भक्तिमय व उत्साही वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता, रेणुकामाता आणि अष्टभुजा देवीच्या प्रतिमा पूजनाने झाली. हे आयोजन राष्ट्र सेविका समितीच्या दक्षिण रत्नागिरी सेवा प्रमुख डॉ. सौ. रंजनाताई केतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समिती सेविकांनी केले होते, तर पाठाचे मुख्य मार्गदर्शन सौ. विशाखाताई भिडे यांनी केले.
या मंत्रयोग साधनेमुळे वातावरण शुद्धी, उच्चार शुद्धी आणि मनःशक्तीचे जागरण होते. तसेच या पठणातून सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होऊन विश्वाच्या कल्याणासाठी सुमंगल चिंतन केले जाते. या विशेष उपक्रमात १०० हून अधिक महिला साधकांनी सहभाग नोंदवून सामूहिक पठण केले. कार्यक्रमाला गोगटे कॉलेजच्या उपप्राचार्य तथा संस्कृत भारतीच्या प्रांत कार्यकर्त्या कल्पनाताई आठल्ये, राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका विद्याताई पटवर्धन आणि ज्येष्ठ साधक अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमा दरम्यान महिलांना नियमित मार्गदर्शन करून पठण शिकवणाऱ्या नारायणी मंडळाच्या सौ. विशाखाताई भिडे, स्वानंद पठण मंडळाच्या सौ. अश्विनीताई जोशी आणि रेणुका प्रतिष्ठानच्या (मंत्रयोग उपक्रम प्रमुख) सौ. योजनाताई घाणेकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबे सकारात्मक विचारांशी जोडली गेली आहेत. अतिशय पवित्र, प्रसन्न व आल्हाददायक वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियाताई केळकर यांनी केले, तर रेणुका प्रतिष्ठानच्या सचिव मानसीताई डिंगणकर यांनी गायलेल्या ‘वंदे मातरम’ने सोहळ्याची सांगता झाली.
