Thursday, April 16, 2026

चिपळूण पोलिसांची ‘सुपरफास्ट’ कामगिरी! १४ लाखांच्या दागिने चोरीचा अवघ्या २४ तासांत पर्दाफाश

Date:

आरोपी महिला जेरबंद; ११ तोळे सोने हस्तगत करत पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचा पुन्हा एकदा ‘धडाका’

चिपळूण | प्रतिनिधी : शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत प्रवाशाचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला चिपळूण पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. अत्यंत कौशल्याने तपास करत पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या असून, तिच्याकडून सुमारे १४ लाख रुपये किमतीचे ११ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

नेमकी घटना काय? : दोन दिवसांपूर्वी चिपळूण बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. याचाच फायदा घेत चोरट्यांनी एका महिलेच्या पर्समधील दागिन्यांचे पाकीट अत्यंत शिताफीने लंपास केले. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. गर्दीच्या ठिकाणी भरदिवसा झालेली ही चोरी पोलिसांसाठी एक मोठे आव्हान होते.

असा लागला छडा : पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी तक्रार मिळताच तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यांनी पथके तयार करून खालील बाबींवर लक्ष केंद्रित केले:

सीसीटीव्ही फुटेज: बसस्थानक आणि परिसरातील सर्व कॅमेऱ्यांचे बारकाईने निरीक्षण केले. संशयित हालचालींबाबत माहितीदारांकडून घेतलेली माहिती, तांत्रिक बाबींच्या आधारे संशयित महिलेचा माग काढणे, या साखळीचा आधार घेत पोलिसांनी आरोपी महिलेला शोधून काढले आणि तिच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल (११ तोळे सोने) हस्तगत केला.

मेंगडे यांची ‘दुसरी’ मोठी कामगिरी : काही दिवसांपूर्वीच रामपूर येथील भीषण हत्याकांडाचा छडा देखील फुलचंद मेंगडे यांनी अवघ्या २४ तासांत लावला होता. त्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच, पुन्हा एकदा १४ लाखांच्या चोरीचा गुन्हा तितक्याच वेगाने उघडकीस आणल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे.

“पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधिक्षक महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.”

नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव : चिपळूण पोलिसांच्या या ‘धडाकेबाज’ कामगिरीमुळे शहरात समाधान व्यक्त होत आहे. ऐन गर्दीच्या हंगामात चोरांना जेरबंद केल्यामुळे प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलीस दलाचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

शेअर करा

आणखी वाचा