मुंबई प्रतिनिधी : स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात हा महिलांवरील अत्याचारामुळे चर्चेत आला असून बलात्काराच्या गंभीर आरोपाखील त्याला अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या सिन्नरमधल्या अशोक खरात याला लैंगिक शोषण आणि छळाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्या घरातून शस्त्रे, काडतुसे जप्त करण्यात आली असून अनेक नेते, राजकारणी, सेलिब्रिटींशी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी असलेले संबंध समोर आले आहेत. अनेक राजकारणी नेत्यांचे खरात यांच्याशी संबंध असून एकनाथ शिंदे, दीपक केसरकर यांच्यासोबतचे फोटोही उघड झाले. मात्र याच प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचेही अशोक खरात यांच्यासोबतचे फोटो समोर आलेत.
रुपाली चाकणकर खरात यांच्या शिष्या : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर या तर खरात यांच्या शिष्या आहेत. त्यांनी त्यांचे पाद्यपूजन करताना, त्यांच्या डोक्यावर छत्री धरतानाचे असे अनेक फोटो, तसचे व्हिडीओ यापूर्वी समोर आले होते. आता सुनील तटकरे यांनी खरात यांच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावली होती, त्यावेळचे त्यांचे काही फोटो समोर आले आहेत. तटकरे यांची त्या वेळची पोस्टही व्हायरल झाली आहे. त्या लग्नात तटकरे यांच्यासोबत दीपक केसरकर हेही उपस्थित असल्याचे दिसून आले.
तटकरे यांनी लग्नाचे काही फोटो केले होते शेअर : ”आज नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे चि. शुभम आणि चि. सौ. कां. त्रिप्तबाला यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून, नवदांपत्याला सुखी, समृद्ध आणि आनंदी सहजीवनासाठी शुभाशीर्वाद दिले.” अशी पोस्ट लिहीत तटकरे यांनी लग्नाचे काही फोटो शेअर केले होते. एका फोटोत त्यांच्या शेजारी भोंदू बाबा अशोक खरात हे बसलेले दिसत आहेत. हेच फोटो आता वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले आहेत.
