Saturday, June 6, 2026

साखरी-नाटे जेटीचे पिलर खचले, भरावाला पडल्या भेगा; जेटीच्या कामाच्या दर्जाबाबत संशय

Date:

राजापूर प्रतिनिधी – तालुक्यातील साखरी-नाटे येथे सुरू असलेल्या जेटीच्या कामाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच पिलर खचल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सुरुवातीलाच जेटीचे पिलर खचल्याने हे काम निकृष्ठ दर्जाचे होत असून ही जेटी टिकणार तरी कशी? असा सवाल मच्छीमार आणि स्थानिक ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात साखरी-नाटे तसेच दापोली तालुक्यातील एका जेटीला शासनाची मंजुरी मिळाली आहे. यासाठी शासनाने कोटयवधीचा निधी मंजूर केलेला आहे. राजापूर तालुक्यातील महत्वपुर्ण अशा साखरी-नाटे धाऊलवल्ली परिसरात या जेटीचे काम सुरू करण्यात आले. जेटी उभारणीसाठी दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी सुरुवातीलाच उभारण्यात आलेल्या पिलरपैकी काही पिलर चिखलात खचल्याचे समोर आले असून भरावालाही मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सुमारे १०० ते १५० पिलर उभारण्याचे काम सुरू आहे. या बाबत संबधित ठेकेदाराशी संपर्क साधला असता त्यांनी “सदरची जमीन दलदलीची असल्यामुळे काही पिलर खचले आहेत. हा तांत्रिक मुद्दा असून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन पुढील काम अधिक सक्षमपणे केले जाईल,” असे स्पष्टीकरण दिले. मात्र या स्पष्टीकरणाने ग्रामस्थांचे समाधान झालेले नाही. “जर जमीन दलदलीची आहे हे आधीपासूनच माहित होते, तर त्यानुसार मजबूत पाया, तांत्रिक नियोजन आणि आवश्यक उपाययोजना का केल्या नाहीत?” असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शेअर करा

आणखी वाचा