सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन बाळ माने ‘एबी फॉर्म’सह रत्नागिरीकडे रवाना
रत्नागिरी प्रतिनिधी : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार आणि पक्षाचे उपनेते सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांना रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज मुंबईत श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आणि पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ (AB Form) स्वीकारून बाळ माने रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत.
बाळ माने यांना ही महत्त्वपूर्ण उमेदवारी मिळण्यामागे शिवसेना खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत, माजी मंत्री अनंतराव गीते, आमदार भास्करराव जाधव, आमदार अनिल परब, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार मिलिंद नार्वेकर या सर्वच ज्येष्ठ नेत्यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व पाठबळ लाभले आहे.
‘एबी फॉर्म’ स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना उपनेते बाळ माने यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रेरणा, उद्धवजी ठाकरे साहेबांचे आशीर्वाद आणि जनतेचा अढळ विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. रायगड, रत्नागिरी आणि संपूर्ण कोकणवासीयांच्या हक्कासाठी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.”
बाळ माने यांच्यासारखा मोठा आणि अनुभवी चेहरा मैदानात उतरल्यामुळे महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कोकणातील या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने रंजक होणार आहे.
