Saturday, June 6, 2026

हर्णे येथील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी ८ जणांना अटक; रत्नागिरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील हर्णे येथील गोवा किल्ला परिसरात झालेल्या एका जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने तत्पर कारवाई करत आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली आहे. व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हिडिओ टाकल्याच्या कारणावरून हा हल्ला झाला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.  

घटनेचा तपशील:  दिनांक २७ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे जखमी सोबती गोवा किल्ला परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या आरोपींनी “कालच्या घटनेचा व्हिडिओ व्हॉट्सॲप ग्रुपवर का टाकला?” असे विचारत वादावादी सुरू केली. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि आरोपींनी तिथे पडलेल्या लोखंडी शिगेने फिर्यादी व त्यांच्या मित्रावर जीवघेणा हल्ला चढवला. त्यांच्यासोबत असलेल्या अन्य १०-१५ मुलांनीही लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली.

या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांचे मित्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला, तोंडाला आणि पाठीला गंभीर दुखापती झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू असून साक्षीदारांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.  

अटक करण्यात आलेले आरोपी: पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून खालील आरोपींना अटक केली आहे:

१) जेन अस्लम हुनैरकर (२२ वर्षे) २) मुफीज जावेद सोलकर (२३ वर्षे) ३) सलाह हसन कोडविलकर (१९ वर्षे) ४) नबिल निसार काझी (१९ वर्षे) ५) जैब ताजुद्दिन जमादार (२६ वर्षे) ६) हर्षद अझीम हुनेरकर (२५ वर्षे) ७) नाईफ आरिफ श्रीवर्धनकर (१९ वर्षे) ८) एक विधीसंघर्षित बालक   

हे सर्व आरोपी हर्णे बंदर मोहल्ला येथील रहिवासी आहेत. यातील पहिल्या पाच आरोपींना १ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

पोलीस पथकाची कामगिरी: रत्नागिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस, दापोलीचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या गुन्ह्यात अन्य आरोपींचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.

शेअर करा

आणखी वाचा