रत्नागिरी प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातील मौजे- जुवाठी शिर्केवाडी येथे एका खासगी विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याला वन विभागाने अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितरीत्या बाहेर काढले आहे. विशेष म्हणजे, पिंजरा विहिरीत सोडल्यानंतर अवघ्या ४ मिनिटांत या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या रेस्क्यू टीमला यश आले.
नेमकी घटना काय? : बुधवार, १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास जुवाठी शिर्केवाडी येथील श्री. रामचंद्र नारायण भारती यांच्या विहिरीत एक वन्यप्राणी पडल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. विहिरीची खोली सुमारे ३५-४० फूट होती. बिबट्या विहिरीत असलेल्या एका दगडावर जीव मुठीत धरून बसला होता. या घटनेची माहिती मिळताच जुवाठीच्या पोलीस पाटलांनी तातडीने राजापूर वन विभागाला दूरध्वनीवरून याची कल्पना दिली.
वेगवान रेस्क्यू ऑपरेशन : घटनेचे गांभीर्य ओळखून परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल, वनरक्षक आणि रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सकाळी ११:०५ वाजता पिंजरा दोरीच्या सहाय्याने विहिरीत सोडण्यात आला. अवघ्या ४ मिनिटांत, म्हणजेच ११:०९ वाजता बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
नैसर्गिक अधिवासात मुक्त : रेस्क्यू केल्यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. श्री. वेर्लेकर यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. हा बिबट्या मादी जातीचा असून तिचे वय साधारण दीड ते दोन वर्षे आहे. तपासणीत बिबट्या पूर्णपणे सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतर, विभागीय वनअधिकारी (चिपळूण) श्रीम. गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक श्रीम. प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या मुक्त करण्यात आले.
या टीमने फत्ते केली कामगिरी : या मोहिमेत वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, वनपाल जयराम बावदाणे, वनरक्षक विक्रम कुंभार तसेच रेस्क्यू टीमचे सदस्य दीपक चव्हाण, निलेश म्हादये, नितेश गुरव, संदीप जाधव, साहील जांगळी आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
