दापोली प्रतिनिधी : दापोली-मंडणगड महामार्गावर मंगळवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. डंपरमधील माती रिकामी करत असताना वरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीला डंपरचा स्पर्श झाला. या अपघातात डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, अशफाक हुसेन आराइ (वय ६०) असे मृत चालकाचे नाव आहे.
नेमकी घटना काय? : मंगळवारी सकाळी ११ ते ११:३० च्या सुमारास दापोली-मंडणगड मार्गावरील भवानी मार्बल दुकानासमोर ही घटना घडली. अशफाक आराइ हे आपल्या डंपरमधून मातीची वाहतूक करत होते. माती रिकामी करण्यासाठी त्यांनी डंपरचा मागील भाग (डालं) वर उचलला असता, त्याचा स्पर्श वरून जाणाऱ्या महावितरणच्या मुख्य वीज वाहिनीला झाला.
जागीच मृत्यू आणि परिसरात खळबळ : वीज वाहिनीचा स्पर्श होताच संपूर्ण डंपरमध्ये हायव्होल्टेज विद्युत प्रवाह (करंट) उतरला. यावेळी चालक सीटवर असलेल्या अशफाक यांना विजेचा भीषण झटका बसला. हा झटका इतका तीव्र होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. “अशफाक यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.”
मृत चालक अशफाक हुसेन आराइ हे मूळचे ताडील गावचे रहिवासी होते. सध्या ते आपल्या कुटुंबासह दापोली येथील खोडा परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्या निधनाने आराइ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दापोली परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर : या भीषण अपघातानंतर स्थानिक नागरिकांमधून महावितरणच्या कारभारावर आणि वीज वाहिन्यांच्या सुरक्षिततेबाबत संतप्त सवाल उपस्थित केले जात आहेत. महामार्गालगत असलेल्या या वीज वाहिन्या सुरक्षित उंचीवर आहेत का? याची चर्चा आता रंगू लागली आहे.
या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून दापोली पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत. ऐन कामाच्या वेळी घडलेल्या या मृत्यूमुळे कामगार वर्गातही भीतीचे वातावरण पसरले आहे.
