वैभववाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली-वैभववाडी मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. वैभववाडी तालुक्यातील नेर्ले गावच्या भाजपच्या विद्यमान सरपंच निलांबरी पांचाळ आणि उपसरपंच पंढरीनाथ सुर्वे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी काल सायंकाळी भाजपला रामराम ठोकून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे तालुक्यात भाजपला मोठे खिंडार पडले आहे.
माजी खासदार व शिवसेना नेते विनायक राऊत, माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आणि महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. शिवसेना नेत्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे गळ्यात भगवी शाल घालून पक्षात उत्स्फूर्त स्वागत केले.
‘भगवे वादळ’ संपणार नाही; विनायक राऊत यांचा विरोधकांवर हल्लाबोल : यावेळी बोलताना माजी खासदार विनायक राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, “घाणेरड्या राजकारणाचा चिखल आणि विरोधाच्या असंख्य लाटा झेलत, अनेक उन्हाळे-पावसाळे अनुभवूनही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ताठ कण्याने उभा आहे. अनेकांनी शिवसेना संपवण्याचे कुभांड रचले, पण हे ‘भगवे वादळ’ कोणालाही संपवता येणारे नाही.”
देशात हुकूमशाही सुरू, लोकशाही धोक्यात! : देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राऊत म्हणाले, “आज देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का, असा प्रश्न पडतोय. सध्या देशात हुकूमशाही सुरू आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ आणि एकच पक्ष असा अजेंडा राबवून विरोधकांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
पुढाऱ्यांच्या आशीर्वादामुळे सिंधुदुर्गात गोव्यासारखे अनैतिक धंदे: राऊत यांचा गंभीर आरोप
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवत विनायक राऊत यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केले. “गोव्यातून येणारे संशयास्पद ड्रग्स आता थेट सिंधुदुर्गात येत आहेत. गोव्यातील सर्व अनैतिक धंदे आणि तिथले कॅसिनो संस्कृती आता स्थानिक पुढाऱ्यांच्या आशीर्वादामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाय पसरत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक बाब आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
जलजीवन मिशनमध्ये ठेकेदारांची मक्तेदारी : विकासकामांच्या मुद्द्यावर बोलताना राऊत यांनी ‘जलजीवन मिशन’मधील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले. “आम्ही खासदार असताना जलजीवनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. मात्र, आता सत्ताधाऱ्यांचे ठरावीक ठेकेदारच ही कामे लाटत आहेत. यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या स्थानिक ठेकेदारांवर मोठा अन्याय होत आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.
या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे वैभववाडी तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘ठाकरे गटा’चे बळ वाढले असून, भाजपसाठी हा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा इशारा मानला जात आहे.
