कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरातील केळबाईवाडी नजिक असलेल्या वाघसावंत टेंब येथे एका घराला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. घराच्या माडीवरील खोलीला अचानक लागलेल्या या आगीत संपूर्ण खोलीसह आतील सर्व साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीचे वृत्त समजताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.
साहित्य जळून भस्मसात : या भीषण आगीमध्ये खोलीत ठेवलेले कपडे, धान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर सर्व जीवनावश्यक साहित्य जळून भस्मसात झाले असून घरमालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की, लागून असलेल्या शेजारच्या खोलीलाही या आगीची जोरदार झळ बसली. मात्र, सुदैवाने खोलीत असलेला गॅस सिलिंडर स्थानिक नागरिकांनी वेळेत बाहेर काढल्यामुळे एक अत्यंत मोठा आणि भयानक अनर्थ टळला.
आग पूर्णपणे आटोक्यात ::घटनेची माहिती मिळताच कुडाळ नगरपंचायत आणि एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांना तात्काळ पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा जोरदार मारा करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली. या संपूर्ण मदतकार्यात अग्निशमन दलाच्या जवानांना स्थानिक नागरिकांनीही मोलाचे सहकार्य केले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी कुटुंबाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
