दापोली (प्रतिनिधी): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूरजवळ झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक नियंत्रक अनिल मरकड यांचेही मंगळवारी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. मे महिन्याची सुट्टी संपवून आपल्या मूळ गावी, अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तिसगाव येथून दापोलीकडे परतत असताना ३० मे रोजी त्यांच्या कारला पोलादपूर येथे अपघात झाला होता. या भीषण अपघातात त्यांची पत्नी सुवर्णा मरकड आणि मुलगी अनुश्री यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर अनिल मरकड यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर गेले दहा ते बारा दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे, बुधवारी गावी पत्नी सुवर्णा यांचा १२ व्या दिवसाचा विधी होणार असताना, त्याच्या आदल्या दिवशीच अनिल यांचीही प्राणज्योत मालवल्याने परिसरावर तीव्र शोककळा पसरली आहे.
अनिल मरकड हे सन २००७ मध्ये दापोली कृषी विद्यापीठात सहाय्यक अधीक्षक म्हणून रुजू झाले होते आणि आपल्या उत्तम कामगिरीच्या बळावर त्यांनी सहाय्यक नियंत्रक या वरिष्ठ पदापर्यंत पदोन्नती मिळवली होती. अत्यंत जबाबदार आणि मोठ्या पदावर कार्यरत असूनही त्यांचा स्वभाव अत्यंत विनयशील, हसतमुख आणि मनमिळावू असल्याने विद्यापीठ वर्तुळात तसेच मित्रपरिवारात ते कमालीचे लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कोकण कृषी विद्यापीठ परिवारासह दापोली परिसरात आणि त्यांच्या मूळ गावी तीव्र दुःख व्यक्त होत आहे. अनिल मरकड यांचे वडील रावसाहेब मरकड हे पाथर्डी येथील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. आधी सून, नंतर नात आणि आता कर्तबगार मुलाच्या अशा आकस्मिक जाण्याने मरकड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातून या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
चिन्मय आता पूर्णपणे पोरका झाला : या संपूर्ण काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातातून मरकड यांचा अवघा आठ वर्षांचा मुलगा चिन्मय हा सुदैवाने पूर्णपणे सुखरूप बचावला आहे; मात्र अवघ्या दहा दिवसांच्या अंतराने आई, बहीण आणि वडिलांचे छत्र हरपल्यामुळे चिन्मय आता पूर्णपणे पोरका झाला आहे. चिन्मयच्या डोक्यावरील मातृ-पितृछत्र एकाएकी हिरावले गेल्याने उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. अनिल मरकड यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव या त्यांच्या मूळ गावी बुधवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, एक भाऊ, बहीण आणि आठ वर्षांचा मुलगा असा मोठा परिवार असून, या काळजाला चटका लावणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर आणि कोकण कृषी विद्यापीठावर शोककळा पसरली आहे.
