Friday, July 3, 2026

खासदार नारायण राणे गुरूवारी रत्नागिरी दौऱ्यावर; विविध शासकीय, सामाजिक आणि कृषी कार्यक्रमांना राहणार उपस्थित

Date:

 

रत्नागिरी प्रतिनिधी :  माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा लोकसभेचे खासदार नारायणराव राणे हे गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी रत्नागिरी दौऱ्यावर असून दिवसभर विविध शासकीय, सामाजिक, कृषी तसेच जनसंपर्काच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

दौऱ्याची सुरुवात सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जयस्तंभ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीने होणार आहे. येथे विविध कामाचा ते आढावा घेतील. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता मारुती मंदिर येथील होटल विवा एक्झिक्युटिव येथे संविधान हत्या दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनीचे उद्घाटन तसेच ‘आणीबाणीची ५१ वर्षे – विचारमंथन आणि व्याख्याने’ या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात डॉ. संजय केतकर आणि विवेक भावे हे व्याख्यान देणार असून खा. नारायण राणे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना संबोधित करणार आहेत. त्यांनतर दक्षिण आफ्रिकेतील ९० किलोमीटरच्या प्रतिष्ठित कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या रत्नागिरीतील धावपटू अभिजीत पड्याळ आणि प्रसाद देवस्थळी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १.१५ वाजता ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन विविध निवेदने स्वीकारणार आहेत.

दुपारी ३ वाजता भाट्ये येथील कृषी विभागाच्या नर्सरीमध्ये शासनाच्या ‘मागेल त्याला काजू’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना काजू कलमांचे वाटप करण्यात येणार असून या कार्यक्रमाला ते प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता भाट्ये येथील डॉ . बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत नारळ संशोधन केंद्राला सदिच्छा भेट देणार आहेत.

खा. नारायण राणे यांच्या या दौऱ्यामुळे शासकीय, कृषी, सामाजिक आणि पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विविध कार्यक्रमांद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

शेअर करा

आणखी वाचा