Friday, July 3, 2026

मिरजोळेत दोन गटात जोरदार हाणामारी; भाजप पदाधिकाऱ्यासह ५० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल, ७ जण अटकेत

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : शहरालगतच्या मिरजोळे-एमआयडीसी परिसरातील नाचणकर चाळ येथे दुचाकीच्या स्टॅण्डच्या वेल्डिंगच्या कामावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. २१) सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान नाचणकर वर्कशॉप येथे हा वाद झाला. या दोन्ही गटांतील मारहाणीत सहा जण जखमी झाले असून, रत्नागिरी शहर पोलिसांनी या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह दोन्ही बाजूंच्या ५० हून अधिक जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच या घटनेप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.

पहिल्या गटाचे फिर्यादी मिनार रायबा पाटील (वय ३८, रा. पाटीलवाडी, मिरजोळे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी दुचाकीचा स्टॅण्ड वेल्डिंगसाठी नाचणकर वर्कशॉपमध्ये दिला होता. मात्र, काम समाधानकारक न झाल्याने ते पुन्हा वर्कशॉपमध्ये जाऊन संबंधित मेस्त्रीला जाब विचारत असताना वाद निर्माण झाला. या वादातून संदीप उर्फ बावा नाचणकर, नाना नाचणकर यांच्यासह इतर सुमारे २५ जणांनी एकत्र येत त्यांना लाकडी फळीने बेदम मारहाण केली. या हाणामारीत मिनार पाटील यांची सोन्याची चेन गहाळ झाली असून, त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या नातेवाइकांच्या कारची काचही लोखंडी रॉडने फोडण्यात आली. या मारहाणीत मिनार पाटील, तुषार पाटील आणि दिनेश पाटील हे जखमी झाले आहेत.

दुसऱ्या बाजूने प्रतिक संतोष नाचणकर (वय २४, रा. नाचणकर चाळ, मिरजोळे) यांनी पोलिसात प्रतितक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, काही व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत वर्कशॉपमध्ये येऊन शिवीगाळ करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते तिथे गेले होते. त्यावेळी मिनार पाटील यांनी त्यांच्याशी वाद घालून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मिनार पाटील यांनी आपल्या नातेवाइकांना बोलावून घेतले. काही वेळातच समर्थ पाटील, धीरज पाटील यांच्यासह इतर २२ जणांचा जमाव तेथे आला आणि त्यांनी चाकूने भोसकण्याची धमकी देत लाकडी फळ्या व लोखंडी रॉडने नाचणकर यांच्यावर हल्ला केला. या घटनेत सौरभ नाचणकर, सोहन नाचणकर आणि प्रतिक नाचणकर हे तिघे जखमी झाले.

या दोन्ही गटांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले असून मिरजोळे परिसरामध्ये या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी तातडीने पावले उचलत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दोन्ही पक्षांच्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी ५० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हे नोंदवले असून, दंगल घडवणे आणि मारहाण केल्याप्रकरणी सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिस करत आहेत.

शेअर करा

आणखी वाचा