रत्नागिरी प्रतिनिधी : पानवल-वाघधरा परिसरातील एका आंबा बागेत ३३ वर्षीय तरुणाचा मृतदेह अत्यंत संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अविनाश अनंत घवाळी (वय ३३) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास अविनाश नेहमीप्रमाणे वाघधरा येथील आपल्या आंबा बागेत औषध फवारणीसाठी गेला होता. मात्र, दुपार झाली तरी तो घरी न परतल्याने नातेवाईकांनी बागेत शोध सुरू केला. दुपारी सव्वादोनच्या सुमारास बागेत जे दृश्य दिसले, त्याने सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.
घटनास्थळावरील संशयास्पद बाबी:
अविनाश बागेत उताण्या अवस्थेत बेशुद्ध पडला होता.
त्याच्या तोंडातून फेस येत होता. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गंभीर जखम होऊन मोठा रक्तस्राव झाला होता. जवळच एक औषधाची बाटलीही सापडली.
त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
औषध फवारणी करताना विषबाधा झाली, की डोक्यावर वार करून त्याचा घातपात करण्यात आला? या गूढ प्रश्नाचे उत्तर आता रत्नागिरी पोलीस शोधत आहेत. ‘बीएनएसएस’ कलम १९४ नुसार तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
