विशेष प्रतिनिधी, रत्नागिरी : कोकणातील प्रलंबित अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्द्यावरून भाजप खासदार नारायण राणे यांनी घेतलेल्या अत्यंत टोकाच्या भूमिकेमुळे कोकणात नवा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी आंदोलकांना थेट ‘फटकवण्याचा’ दम भरला, तसेच ठाकरे गटात लवकरच दुसरा मोठा भूकंप होणार असल्याचा खळबळजनक दावाही केला.
प्रकल्पांचे स्वागत, विरोधकांना ‘सज्जड दम’
कोकणात अणुऊर्जा किंवा वीज निर्मितीचा कोणताही प्रकल्प आल्यास आपण त्याचे जाहीर स्वागतच करू, कारण यामुळेच कोकणाची खरी प्रगती होईल, असे राणे म्हणाले. प्रकल्पाला विरोध करणारे स्थानिक नसून ते केवळ ‘व्यावसायिक’ आंदोलक असल्याचा आरोप त्यांनी केला.
पडद्यामागील मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत
ठाकरे गटाचे उरलेले खासदार भाजपच्या गळाला लागल्यानंतर आता आमदारांची बारी असल्याचा दावा राणेंनी केला. खासदारांना मिळालेले राजकीय वर्चस्व पाहून आमदारही बंडाच्या पवित्र्यात असून उद्धव ठाकरेंकडे आता काहीच शिल्लक राहणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.
राणे कडाडले! रत्नागिरीतील पत्रकार परिषदेतील ५ मोठे दावे
१. आंदोलक की व्यावसायिक? : प्रकल्पांना विरोध करणारे स्थानिक लोक नाहीत. ते केवळ पैसे घेऊन आंदोलन करणारे व्यावसायिक आहेत. हिंमत असेल तर त्यांनी समोर यावे.
२. बाळासाहेबांची आठवण, उद्धव ठाकरेंवर खंत: : “मला बाळासाहेबांची आठवण येते, उद्धवची नाही.” ज्या शिवसेनेला स्वतः वाढताना पाहिले, तिचा केवळ ३ खासदारांवर आलेला अस्त पाहून मनाला बरे वाटत नाही.
३. संजय राऊतांना आव्हान: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करणाऱ्या संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांनी आधी स्वतः कोणाच्या सहानुभूतीवर टिकून आहेत ते जाहीर करावे.
४. ‘टायगर’ भाजपच्या वाटेवर: ठाकरे गटाचे आमदार आता भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. खासदारांनंतर आता आमदारांचा मोठा गट बंड करेल.
५. विकासासाठी आक्रमक भूमिका: ,कोकणच्या आर्थिक प्रगतीसाठी अणुऊर्जा प्रकल्पाची गरज आहे आणि विकासाच्या आड येणाऱ्यांना कायद्याच्या आणि ‘राणे’ शैलीत उत्तर दिले जाईल.
