पिंपरी-चिंचवड : नाशिक इथं उघडकीस आलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पिंपरी-चिंचवड इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पीडित महिलांना थेट सरकारशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं. राज्य सरकार पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, त्यांना न्याय मिळावा, यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
नितेश राणे नेमकं काय म्हणाले? : यावेळी नितेश राणे यांनी अशोक खरात प्रकरणानंतर उमटलेल्या सार्वजनिक प्रतिक्रियांवरही भाष्य केलं. समाजातील काही घटक धार्मिक पोशाखाचा आडोसा घेऊन लोकांची फसवणूक करतात, असं सांगत त्यांनी स्पष्ट केलं की, ‘प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही कुजके आंबे असतात. त्यामुळे हा विषय कोणत्याही धर्माशी संबंधित नसून महिलांच्या सुरक्षिततेचा आणि समाजातील फसवणूक करणाऱ्या प्रवृत्तींचा आहे. अशा व्यक्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.’ पत्रकारांनी अशोक खरातचे विविध पक्षांच्या नेत्यांशी संबंध असल्याबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. ‘फोटो कुणासोबतही काढले जाऊ शकतात. त्यावरून कोणाचे नैतिक किंवा राजकीय संबंध ठरतात का?’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
‘पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे’ : पुढे बोलताना त्यांनी या प्रकरणाचं राजकारण करण्यावर टीका केली. मूळ मुद्दा म्हणजे पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे, याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. तसेच, काही जण हिंदू धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. या प्रकरणाला धार्मिक रंग न देता पीडितांच्या बाजूनं उभं राहणं हेच योग्य असल्याचं त्यांनी ठामपणे नमूद केलं.
‘महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही’ : अलीकडील काही राजकीय वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वातावरणावर भाष्य करताना मंत्री राणेंनी स्पष्ट इशारा दिला की छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या आदर्श आणि सार्वकालिक व्यक्तिमत्त्वाचा अपमान सहन केला जाणार नाही. महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. इतिहास आणि संस्कृतीचा आदर राखणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
यावेळी त्यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार गंभीर असल्याचं पुन्हा अधोरेखित केलं. अशोक खरात प्रकरणात राज्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत असून, पुढे येणाऱ्या प्रत्येक पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं त्यांनी सांगितलं. अशा भोंदूबाबांचा पर्दाफाश होणं समाजासाठी आवश्यक असून, भविष्यात अशा प्रवृत्तीवर अधिक कठोर कारवाई केली जाईल, अशी आश्वासनदेखील त्यांनी दिली.
