गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांच्या पाठपुराव्याला यश
गुहागर प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील ऐतिहासिक आणि शिवकालीन ‘गोपाळगड’ किल्ला अखेर खाजगी मालकीतून मुक्त होऊन शासनाच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चालू असलेली आचारसंहिता २५ तारखेला संपल्यानंतर, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी या संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरू करणार असल्याची मोठी घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. त्यामुळे गुहागरचे पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे मोठे यश आले आहे.
सभापती प्रणव पोळेकर यांचे पालकमंत्र्यांना निवेदन
पालकमंत्री उदय सामंत गुहागर दौऱ्यावर असताना, पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर यांनी त्यांची भेट घेऊन एक महत्त्वपूर्ण निवेदन सुपूर्द केले. या निवेदनात त्यांनी गोपाळगड किल्ला तातडीने महाराष्ट्र राज्य पुरातत्व आणि महसूल विभागाच्या नावे करण्याची मागणी केली होती.
निवेदनातील मुख्य मुद्दे: : अंजनवेल येथील शिवकालीन ‘गोपाळगड’ किल्ल्याच्या ७/१२ उताऱ्यावर काही तांत्रिक चुकांमुळे स्थानिक रहिवाशांची नावे लागली आहेत.
सध्या या किल्ला क्षेत्रात स्थानिकांची वहिवाट असून तिथे आंब्याची बागायती केली जाते.
हा किल्ला खाजगी मालकीतून मुक्त करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, शिवप्रेमी, स्वयंसेवी संस्था आणि प्रसारमाध्यमं अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत.
कायदेशीर बाबी बऱ्यापैकी पूर्ण झाल्या असून, पुरातत्व व महसूल विभागाची अंतिम टप्प्यातील कारवाई प्रलंबित आहे.
पालकमंत्र्यांची तात्काळ दखल आणि जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
सभापती प्रणव पोळेकर यांनी दिलेल्या निवेदनाची पालकमंत्री उदय सामंत यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी तत्काळ रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली. सध्या लागू असलेली आचारसंहिता २५ तारखेला संपताच, गोपाळगड शासनाच्या ताब्यात घेण्याची प्रत्यक्ष कायदेशीर प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
राज्य संरक्षित स्मारक असलेल्या गोपाळगडाची वास्तू खाजगी विळख्यातून मुक्त होणार असल्याने, तमाम शिवप्रेमी आणि गुहागरवासीयांकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत केले जात आहे. आता २५ तारखेनंतर प्रशासकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
