हॉटेल व्यवसायिकांच्या समस्येबाबत पालकमंत्री उदय सामंत यांची सकारात्मक भूमिका – रमेश कीर
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या धोरणामुळे राज्य सरकार समोरही अडचणी
प्रकाश वराडकर
रत्नागिरी – इराण इस्रायल अमेरिका युद्धाचे दुष्परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागत असताना देशातही इंधनाच्या कमी होणाऱ्या पुरवठ्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी सह संपूर्ण जिल्हाभरात हॉटेल व्यवसायिकांची व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने मोठी व्यावसायिक कोंडी झाली आहे. रत्नागिरीतील हॉटेल व्यवसायिकांची समस्या सुटावी यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी हॉटेल व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने काल भेट घेतली. त्यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यावसायिकांची ही कोंडी फुटावी यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. मात्र केंद्र सरकारचे पेट्रोलियम बाबतचे धोरण आणि निर्णय यामुळे राज्य सरकार समोरही पेच निर्माण झाला आहे. मात्र रत्नागिरीत गॅस पाईप लाईन ची सुविधा उपलब्ध असून संबंधित गॅस पाईपलाईन पुरवठादाराशी आपण चर्चा केली असून रत्नागिरीतील हॉटेल व्यवसायिकांना आणि ज्यांना आवश्यक असेल त्या सर्वांना तातडीने पाईपलाईन गॅस कनेक्शन उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश मंत्री सामंत दिले आहेत अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी हॉटेल व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांनी रत्नागिरी खबरबात शी बोलताना दिली आहे.
याबाबत बोलताना हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर म्हणाले की व्यावसायिक सिलेंडर बाबतची स्थिती निश्चितपणे चिंताजनक आहे आणि या संदर्भात मार्ग काढण्यासाठी आम्ही गेल्या दहा-बारा दिवसात पालकमंत्री उदय सामंत यांची शिष्टमंडळाद्वारे दोन वेळा भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. पालकमंत्री सामंत हे या समस्येबाबत पॉझिटिव्ह आहेत आणि हे हॉटेल व्यवसायिकांची समस्या लवकरात लवकर सुटावी यासाठी प्रयत्नशील ही आहेत. त्यांनी तातडीने प्रांत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या. येथील व्यवसाय सुरू झाले पाहिजेत. त्यासाठी आवश्यक ती पावले उचलले पाहिजे, अशा सूचना त्यांनी दिल्या. पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या परंतु वस्तुस्थिती अशी आहे की युद्ध स्थिती आहे आणि इंधन पुरवठ्याचा विषय हा राज्य सरकार पेक्षाही केंद्र सरकारच्या आखत्यारीतील आहे. त्यामुळे केंद्राच्या धोरणावर सर्वकाही सुरू आहे परंतु रत्नागिरीतील अधिकाऱ्यांचीही व्यावसायिक गॅस पुरवठ्याच्या संदर्भातील भूमिका ही सकारात्मक आहे. अगदी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांची भूमिकाही याबाबत सकारात्मक आहे, असे आम्हाला चर्चेच्या वेळी दिसून आले, असेही श्री कीर म्हणाले.
श्री. कीर पुढे म्हणाले की दोन दिवसांपूर्वीच मी विधान भवन येथे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे भेट घेतली. तेथूनही त्यांनी प्रांत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तसेच हॉटेल व्यवसायिकांची संघटनेकडून यादी घ्या आणि वितरण कसे करता येईल याबाबत निर्णय घ्या, असेही पालकमंत्री सामंत यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला सांगितले. त्यातच कालच केंद्र सरकारने दुसरा एक जीआर काढला आहे ज्याद्वारे आणखी 20% प्रमाण हे व्यावसायिक सिलेंडर वाढीसाठी देण्यात आले आहे त्यामुळे आधीची 30% आणि आताचे 20 टक्के असं हे प्रमाणात 50 टक्के पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटवाल्यांना काही प्रमाणात तरी गॅस पुरवठा होईल, अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. या गॅस वितरणाबाबतचे जे अधिकार आहेत ते जिल्ह्यातील त्या त्या प्रांत विभागांना दिलेले आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांना विषयाचे गांभीर्य माहिती आहे आणि त्यांची भूमिका ही सकारात्मक आहे, ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे असेही रमेश कीर म्हणाले.
गेल्या दहा-बारा दिवसात व्यावसायिक हॉटेल्स ना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळालेले नाहीत. परंतु पालकमंत्र्यांशी रविवारी चर्चा झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पहिल्या 30 जणांची यादी प्रशासनाकडे देण्यात आली आहे. त्यानंतर आणखी दुसरी ३५ जणांची यादी तयार असून ही यादी लवकरच देण्यात येईल. त्यामुळे या हॉटेल व्यवसायिकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर काही प्रमाणात उपलब्ध होऊ शकतील. सध्या तरी जो हॉटेल व्यवसाय सुरू आहे तो चुलीवर सुरू आहे असे म्हटले जात आहे परंतु ती एक कवी कल्पना आहे किंवा एक मजबुरी आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर ज्यावेळी हॉटेल व्यवसाय सुरू ठेवायचा आहे त्यावेळी माझे शंभर मेनू हे गॅस सिलेंडरची सुविधा उपलब्ध नसताना मी सुरू ठेवू शकत नाही, असेही कीर म्हणाले.
हॉटेल व्यवसायिक काय म्हणाले?
व्यवसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने सर्वच हॉटेल व्यवसायिकांची मोठी कोंडी झाली आहे. येणाऱ्या ग्राहकांना आम्ही त्यांना हवे असलेले चायनीज असेल साउथ इंडियन असेल मालवणी पदार्थ असतील किंवा अन्य प्रकारचे खाद्यपदार्थ हे आम्ही पुरवू शकत नाही.
त्यामुळे आम्हाला पूर्वी रात्री बारा वाजेपर्यंत चालणारे हॉटेल्स आता साडेनऊ दहा वाजेपर्यंतच बंद करावे लागते तर ग्राहक असले तरी त्यांना फिरून जावे लागते. कोळसा तसेच लाकूडफाटा वापरून जेवण बनवण्यासाठी अधिक वेळही लागतो.
एक हॉटेल जेव्हा बंद होते तेव्हा फक्त त्यामुळे हॉटेलमध्ये सर्व कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब हेच प्रभावित होतात असे नाही तर हॉटेलशी संबंधित सर्व पुरवठादारही प्रभावित होतात त्यांच्या व्यवसायावरही गंभीर परिणाम होत आहे.
———–
हॉटेल व्यवसायाची स्थिती ही अत्यंत चिंताजनक
इराण इस्रायल अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाची कमतरता ही मोठी समस्या बनली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या संदर्भात मोठी समस्या नसली तरी व्यावसायिक सिलेंडर पुरवठा बाबतची स्थिती चिंताजनक आहे. आपल्या हॉटेल व्यवसायाला गेल्या बारा दिवसात एकही सिलेंडर मिळालेला नाही. त्यामुळे आमच्याकडे असंख्य मेनू असले तरी हे मेनू आता खूप कमी करावे लागले आहेत आणि मिळेल त्या पर्यायी इंधनावर सध्या हॉटेल व्यवसाय सुरू आहे. परंतु गेल्या दहा ते पंधरा दिवसातील जिल्ह्यातील आणि रत्नागिरी शहर परिसरातील हॉटेल व्यवसायाची स्थिती ही अत्यंत चिंताजनक अशी आहे. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद करावा असे आदेश आल्यानंतर गेल्या दहा ते बारा दिवसात मला एकही व्यावसायिक सिलेंडर प्राप्त झालेला नाही. उद्या एक सिलेंडर मिळेल असे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात माझ्या दोन हॉटेल्स साठी दिवसाला दोन ते तीन सिलेंडर आवश्यक असतात परंतु सध्या व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध नसल्याने व्यवसायाची कोंडी झाली आहे. काहीही करून हॉटेल सुरू राहिले पाहिजे यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरू आहेत. कोणी लाकडांचा वापर करीत आहेत तर कोणी कोळशाचा वापर करीत आहेत परंतु या इंधनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणातील ग्राहक सांभाळणे शक्य होणार नाही. त्यामुळेच काही ठराविक पदार्थच सध्या दिले जात आहेत. अजून काही दिवस असेच राहिल्यास हॉटेल व्यवसायापुढे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे
उदय लोध, हॉटेल व्यावसायिक, रत्नागिरी
—————–
लवकरात लवकर मार्ग निघणे आवश्यक
गेल्या दहा ते बारा दिवसांपासून व्यावसायिक सिलेंडर हॉटेल व्यवसायिकांना मिळत असल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांचे निश्चितपणाने व्यावसायिक कोंडी झाली आहे अनेकांना अर्धवट स्थितीत हॉटेल व्यवसाय करावा लागतो आहे तर काहीजणांचा हॉटेल व्यवसाय बंद होण्याचा मार्गावर आहेत अशी गंभीर स्थिती आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे अशी सर्वांचीच मागणी आहे. मात्र आपले मारुती मंदिर मजगाव रोड येथील हॉटेल मत्स्यम पूर्णवेळ सुरू आहे याचे कारण या आमच्या हॉटेलला पाईप द्वारे गॅस पुरवठा कनेक्शन मिळालेले आहे. मात्र शहरातील अन्य कोणालाही हे सुविधा याआधी घेता आलेली नाही त्यामुळे त्यांची सद्यस्थिती गॅस विना चिंताजनक बनले आहे. त्यातून लवकरात लवकर मार्ग निघणे आवश्यक आहे.
सचिन देसाई, हॉटेल व्यवसायिक
