Saturday, June 6, 2026

रत्नागिरीसह पाच जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा प्रचंड वाढणार, ‘हिटवेव’चा सामना करावा लागणार

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : मार्च महिन्याच्या सुरुवातीला जाणवलेला प्रचंड उकाडा आणि त्यानंतर झालेली अवेळी गारपीट यामुळे राज्याच्या हवामानात मोठी उलथापालथ झाली आहे. मागील चोवीस तासांत वातावरणात झालेल्या बदलांमुळे आता कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, रत्नागिरीसह पाच जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा प्रचंड वाढणार असून नागरिकांना ‘हिटवेव’चा सामना करावा लागणार आहे. मुंबई आणि कोकणात सूर्याचा प्रखर चटका बसणार त्याचा हापूस आंबा पिकावर ही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच लहरी वातावरणामुळे हापूसचे पी यंदा केवळ दहा ते वीस टक्क्यांपर्यंतच मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच आता उष्णतेच्या लाटेमुळे हापूस पिकावर त्याचा अधिक गंभीर परिणाम होण्याची भीती आहे  ही विचित्र स्थिती सध्या चिंतेचा विषय ठरत आहे.

देशात सध्या निर्माण झालेला मजबूत ‘वेस्टर्न डिस्टरबन्स’ आणि ‘सायक्लोनिक सर्क्युलेशन’ यांचा एकत्रित परिणाम या लहरी हवामानामागे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भूमध्य समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे हिमालयाच्या रांगांना धडकल्यामुळे उत्तर भारतात पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे, ज्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील हवेच्या दाबावर झाला आहे. यंदाचा हा डिस्टरबन्स अत्यंत शक्तिशाली असल्याने हवेच्या कमी दाबाचे पट्टे तयार झाले असून ढगांची चक्राकार हालचाल उत्तर आणि पूर्व भारतावर सक्रिय झाली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात ओलावा वाढला आहे. जेव्हा हा ओलावा जमिनीवरील गरम हवेच्या संपर्कात येतो, तेव्हा अचानक ढगांची निर्मिती होऊन गडगडाटासह पावसाची आणि गारपिटीची स्थिती निर्माण होत आहे.

कोकण आणि गोव्याचा विचार करता मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पट्ट्यात पावसाची शक्यता नसली, तरी उष्णतेचे प्रमाण कमालीचे वाढणार आहे. हवामान विभागाने विशेषतः पाच जिल्ह्यांसाठी हिटवेवचा ‘अलर्ट’ जारी केल्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रात मात्र वादळी वारे आणि गारपिटीचे संकट कायम असल्याने शेतीकामांना या लहरी हवामानाचा मोठा फटका बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

शेअर करा

आणखी वाचा