खेड (प्रतिनिधी) – तालुक्यामधील शिरगाव ग्रामपंचायतमध्ये गेल्या पाच वर्षांत सुमारे ३ कोटी ५०० रुपयांचा भ्रष्टाचार ग्रामसेवक सरपंच आणि ठेकेदार यांच्या संगनमताने झाल्याचे उघडकीस आले आहे. सामाजिक कार्यकर्ते काशिराम भोसले यांनी याबाबत संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांना लेखी निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
काशिराम भोसले यांना त्यांच्या ग्रामपंचायतीत सावळा गोंधळ झाल्याचे निदर्शनास आले. बागवाडी जिल्हा परिषद शाळा ही ३० मे २०२१ ला पूर्ण बंद झालेली आहे, तरी ११ ऑक्टोबर २०२३ ला रुपये २४ हजार रुपये किमतीचा स्मार्ट एलईडी टीव्ही खरेदी केल्याचे दाखवण्यात आले, अशा प्रकारची ३० बिले अमोल बापू पवार या नावाने अदा करण्यात आलेली आहेत. पिंपळवाडी येथे धोबी घाट रुपये २ लाख ३६ हजार २५० रूपये ठेकेदार अमोल मच्छिंद्र जाधव यांच्या नावे टाकण्यात आले आहेत प्रत्यक्षात धोबीघाट रुपये पन्नास हजार किमतीचा नसल्याचे दिसते, हर घर जल ही तीन कोटींची योजना राबवण्यात आली. परंतु, ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. शिरगाव गावामध्ये शिरगाव युवा प्रतिष्ठानची सत्ता ग्रामपंचायतमध्ये असून प्रभारी ग्रामसेवक अजित पवार हे गेली बारा वर्षे या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा कार्यकाळ हा संशयित असून झालेल्या प्रकाराबद्दल प्रशासन काय भूमिका घेणार याकडे भोसले व ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
