विश्वनाथ पंडित
भारतीय संगीतविश्वात ज्यांनी आपल्या जादुई आवाजाने अनेक दशकं अधिराज्य गाजवलं, त्या आशाताई भोसले यांचं जाणं मनाला चटका लावणारे. संगीत कला प्रांताची फार मोठी हानी करणार. आशाताईंचं व्यक्तिमत्त्व हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. संगीत क्षेत्रासाठी निष्ठेने वाहिलेल जीवन असंच म्हणावं लागेल. १९४८ साली ‘चुनरिया’ या चित्रपटातून पार्श्वगायनाला सुरुवात केली.
आशाताईंच्या कारकिर्दीची व्याप्ती आणि वैविध्य पाहिल्यास त्या केवळ एक गायिका नसून एक संपूर्ण संगीतविश्वच होत्या असंच म्हणावं लागेल. शंभराहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी विविध प्रकारची गाणी गायली. विसपेक्षा अधिक भाषांमध्ये सुमारे १२,००० गाणी गाऊन त्यांनी गिनीज बुकमध्ये आपली नोंद केली. त्यांच्या आवाजात शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, गझल, पॉप, कॅब्रे अशा पाश्चात्य शैलीतील गाणीही तितक्याच सहजतेने रंगली. रसिक मनाला गुंफून ठेवण्याची ताकद त्यांच्यात होती.
त्यांच्या कलेची दखल घेत भारत सरकारने पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित केले. तसेच दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण आणि महाराष्ट्र शासनाचे पंधराहून अधिक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. महिला पार्श्वगायिकेच्या दोन राष्ट्रीय पुरस्कारांसह त्यांना ग्रॅमी पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले—हे त्यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलेचं प्रतीक आहे.
आशाताईंचं व्यक्तिमत्त्व केवळ त्यांच्या पुरस्कारांपुरतं मर्यादित नाही. ९० वर्षांनंतरही सातत्याने रियाज करणारी त्यांची जिद्द, संगीतावरील निस्सीम प्रेम आणि सतत स्वतःला अधिक उत्तम बनवण्याची धडपड प्रत्येक कलाकारासाठी आदर्श ठरते. त्यांच्या चेहऱ्यावरचं कायम हसतमुख भाव, संकटांना न जुमानता पुढे जाण्याची वृत्ती आणि जिंदादिल स्वभाव यामुळे त्या सर्वांच्या मनात घर करून राहिल्या.
त्यांच्या प्रत्येक गाण्यात एक वेगळीच माधुर्यपूर्ण छटा असते. गीतात भावनांची सुंदर अभिव्यक्ती, सूरांची नेमकी पकड आणि आवाजातील विविधता यामुळे त्यांनी प्रत्येक गाणं लक्षवेधी बनवलं. अनेक चित्रपट त्यांच्या गाण्यांमुळेच लक्षात राहिले, हे त्यांच्या कलेचं मोठेपण दर्शवतं. आशाताईंचं संपूर्ण आयुष्य हे संगीत सेवेला अर्पण केलेलं आहे—बालपणापासून ते आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी संगीताची अखंड साधना केली. कठोर परिश्रम, सातत्य आणि निष्ठा यांच्या जोरावर त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण तर केलंच परंतु पुढील पिढ्यांसाठी एक समृद्ध संगीत वारसा ठेवून दिला.
आज त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हे दुःख प्रत्येक संगीतप्रेमीला जाणवत आहे. मात्र, त्यांचा जादुई स्वर, त्यांची गाणी आणि त्यांनी दिलेली संगीताची शिदोरी ही कायम आपल्या सोबत राहणार आहे.
आशाताई भोसले या केवळ एक गायिका नव्हत्या, तर त्या भारतीय संगीतविश्वातील एक अष्टपैलू, सदाबहार आणि दैवी कलाकार होत्या—ज्यांचा आवाज मानवजातीसोबत चिरकाल कायम जिवंत राहील तितक्याच त्या माणूस म्हणूनही श्रेष्ठ होत्या. माणसं आणि माणुसकी जपणाऱ्या.
