रत्नागिरी | प्रतिनिधी रत्नागिरी तालुक्यातील पावस-गावखडी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने ओढल्या गेलेल्या तीन मुलांपैकी श्रेयस सागर गोसावी (वय १३) या बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मुलांचे वडील सागर गोसावी यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन मुलगी आणि पुतण्याला सुखरूप बाहेर काढले, मात्र पोटच्या गोळ्याला वाचवण्यात त्यांना अपयश आले.
नेमकी घटना काय?
मूळचे तांदूळवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील रहिवासी असलेले सागर मोहन गोसावी हे सध्या मेर्वी येथे व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. शुक्रवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर कौटुंबिक सहलीसाठी ते आपली मुले आणि पुतण्यासह गावखडी येथील सुरूच्या बनात गेले होते. दुपारी २ च्या सुमारास मुले पाण्यात खेळत असताना अचानक आलेल्या मोठ्या लाटेमुळे तिघेही खोल समुद्रात ओढले जाऊ लागले.
वडिलांचा थरारक बचाव प्रयत्न
मुले बुडत असल्याचे पाहताच सागर गोसावी यांनी क्षणाचाही विलंब न लावता समुद्रात झोकून दिले. त्यांनी अत्यंत शिताफीने आपली मुलगी आरोही आणि पुतण्या देवराज यांना लाटांच्या तावडीतून ओढून बाहेर काढले. त्यानंतर ते पुन्हा श्रेयशला वाचवण्यासाठी धावले, परंतु तोपर्यंत श्रेयश लाटांसोबत खोल पाण्यात बेपत्ता झाला होता.
शोधमोहीम आणि दुर्दैवी अंत
घटनेची माहिती मिळताच पूर्णगड सागरी पोलीस, स्थानिक पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी तातडीने बोटींच्या साहाय्याने शोधमोहीम हाती घेतली. मात्र, शुक्रवारी यश आले नाही. अखेर शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास श्रेयशचा मृतदेह किनाऱ्यालगत तरंगताना आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.
शाळेवर शोककळा श्रेयश हा पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर येथे इयत्ता सहावीत शिकत होता. त्याच्या निधनाची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शाळेत श्रद्धांजली सभा घेऊन शाळा बंद ठेवण्यात आली. श्रेयशचे पार्थिव त्याच्या मूळ गावी तांदूळवाडी (सांगली) येथे नेण्यात आले असून, तिथेच त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
