Friday, April 17, 2026

जनावरे वाहतूक व्यवसायातील वादातून आंबा घाटात दरोडा; मुख्य सूत्रधारासह ९ जणांना अटक

Date:

देवरुख (प्रतिनिधी) : आंबा घाटातील दख्खन येथे जनावरे वाहतूक करणाऱ्या चालकाला लुटल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या दरोडा प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सादाब गनी बलबले (रा. कोकणनगर, रत्नागिरी) याला पोलिसांनी मंगळवारी रात्री रत्नागिरीतून ताब्यात घेतले. बुधवारी त्याला देवरुख न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

व्यवसायातील स्पर्धेतून रचला कट : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दरोडा केवळ लुटीच्या उद्देशाने नसून तो व्यावसायिक वादातून घडला आहे. घाटमाथ्यावर जनावरांचा व्यवसाय करणारे व्यापारी कोकणात येऊन चढ्या दराने जनावरांची खरेदी करतात. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने सादाब बलबले याच्या मनात प्रचंड राग होता. याच रागातून आणि व्यावसायिक स्पर्धेतून त्याने हा दरोड्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

काय घडले होते नेमके प्रकरण? : आठ दिवसांपूर्वी प्रथमेश दळवी हा तरुण आपल्या बोलेरो गाडीतून म्हैस घेऊन रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. आंबा घाटातील दख्खन परिसरात दबा धरून बसलेल्या टोळीने त्याला अडवून लुटले होते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती.

पोलीस कारवाईचा धडाका : घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अवघ्या काही तासांतच कारवाईला सुरुवात केली होती. या प्रकरणात आतापर्यंत ८ आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सादाब बलबले याच्या अटकेमुळे आता अटक झालेल्यांची संख्या ९ झाली आहे. या प्रकरणातील दुसरा सूत्रधार अद्याप पसार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

“जनावरे वाहतुकीच्या व्यवसायातील वादातून हा प्रकार घडला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. फरार असलेल्या दुसऱ्या सूत्रधारालाही लवकरच अटक करण्यात येईल.”

— पोलीस तपास पथक, देवरुख

शेअर करा

आणखी वाचा