रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी-दिवा पॅसेंजर रेल्वे गाडी मुंबईतील दादर रेल्वे स्थानकापर्यंत पूर्वीप्रमाणे नेण्यात यावी, या कोकणवासीयांच्या जुन्या आणि महत्त्वाच्या मागणीला आता मोठे यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत रेल्वे मंत्र्यांनी ही गाडी दादरपर्यंत नेण्याच्या शक्यता तपासून त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. रेल्वे मंत्र्यांच्या या पत्रामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, असे माहिती भाजपचे नेते सचिन वहाळकर यांनी दिली.
रवींद्र चव्हाण यांनी मंत्री असताना कोकण रेल्वेच्या विकासासाठी मोठे योगदान दिले असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. स्थानकांचे सुशोभीकरण, प्रवाशांसाठी अद्ययावत सुविधा आणि रेल्वेच्या फेऱ्यांचे नियोजन यामध्ये त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. आता त्यांनी स्वतः या विषयात लक्ष घातल्याने आणि रेल्वे मंत्र्यांशी थेट संवाद साधल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवासी वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
ही पॅसेंजर गाडी दादरपर्यंत वाढवल्यास कोकणातून मुंबईत नोकरी आणि व्यवसायानिमित्त ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. सध्या दिवा येथे उतरून मुंबईच्या दिशेने प्रवास करताना प्रवाशांचे मोठे हाल होतात, जे या निर्णयामुळे थांबणार आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या या सक्रिय पाठपुराव्यामुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांना लवकरच न्याय मिळेल, अशी भावना रत्नागिरीतील प्रवासी संघटना आणि नागरिक व्यक्त करत आहेत.
