Saturday, June 6, 2026

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून ५० लाखांची लूट; रत्नागिरीतील जांभारकर बंधूंवर गुन्हा दाखल

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : परदेशात नोकरीला लावण्याचे आणि त्यातून मोठे कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून दिल्लीतील एका व्यक्तीची ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी मिरजोळे येथील इसाम इरफान जांभारकर आणि अस्लम इरफान जांभारकर या दोन भावांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात भारतीय न्यायसंहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ जुलै २०२५ ते १ मे २०२६ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला असून, या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

फिर्यादीची ५० लाखांची फसवणूक आणि कामगारांचे हाल : नवी दिल्ली येथील रहिवासी सज्जाद अहमद खान (५४) यांची आरोपींनी आपल्या जाळ्यात ओढले होते. आरोपींच्या शब्दावर विश्वास ठेवून खान यांनी ५६ कामगारांकडून प्रत्येकी ८५ हजार रुपये गोळा करून एकूण ५० लाख रुपये जांभारकर बंधूंच्या मिरजोळे येथील निवासस्थानी सुपूर्द केले. मात्र, आरोपींनी या कामगारांना कराराप्रमाणे नियोजित देशात न पाठवता दुसऱ्याच ठिकाणी पाठवले, जिथे त्यांची मोठी गैरसोय झाली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सज्जाद खान यांना स्वखर्चाने त्या सर्व ५६ जणांना भारतात परत आणावे लागले.

पोलिसांकडून सखोल तपास सुरू :  आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच खान यांनी रत्नागिरी गाठून पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३१६ (२), ३१८ (२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, परदेशात नोकरीला लावणाऱ्या या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा शोध रत्नागिरी पोलीस घेत आहेत. नागरिकांनी अशा प्रकारे परदेशातील नोकरीच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

शेअर करा

आणखी वाचा