रत्नागिरी प्रतिनिधी : कोकणची पर्यटन राजधानी असलेल्या रत्नागिरीची सुरक्षितता अबाधित राखत ग्रामीण पोलिसांनी एका मोठ्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना बेदम मारहाण करून दहशत माजवणाऱ्या चारही संशयित आरोपींना पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत पनवेल येथून शिताफीने ताब्यात घेतले. रत्नागिरी पोलिसांच्या या ‘सुपरफास्ट’ कारवाईमुळे पर्यटकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
हुल्लडबाजीने घेतला हिंसक वळण; पर्यटकांना भररस्त्यात मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, २ मे रोजी मुंबईतील दहीसर येथील पर्यटक आरे-वारेच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर फिरायला आले होते. सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर या पर्यटकांचा सामना चार स्थानिक तरुणांशी झाला. किरकोळ वादाचे रूपांतर अचानक हुल्लडबाजी आणि शिवीगाळीत झाले. या चार तरुणांनी पर्यटकांना भररस्त्यात बेदम मारहाण करत त्यांची प्रचंड दमदाटी केली. या प्रकारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. पर्यटकांनी तात्काळ रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलीस अधीक्षकांकडून तपासाची चक्रे फिरली; तांत्रिक विश्लेषणाचा आधार
रत्नागिरीसारख्या शांत आणि पर्यटनप्रिय जिल्ह्यात झालेली ही घटना पोलीस प्रशासनाने अत्यंत प्रतिष्ठेची केली. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. अधिकारी राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक अभय तेली आणि कॉन्स्टेबल अजिंक्य पवार यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. आरोपी रायगड जिल्ह्यातील पनवेल परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पथकाने तिथे धाव घेतली.
पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक; पर्यटनाला मिळणार बळ
पनवेलमध्ये सापळा रचून पोलिसांनी चारी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांना रत्नागिरीत जेरबंद केले. गुन्ह्याच्या ४८ तासांतच आरोपींना जेरबंद करून पोलिसांनी ‘पर्यटकांची सुरक्षा हेच आमचे कर्तव्य’ असल्याचे सिद्ध केले आहे. या कामगिरीमुळे रत्नागिरी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अशा प्रकारच्या जलद कारवाईमुळे भविष्यात पर्यटकांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांवर वचक बसेल आणि जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
