दापोली (प्रतिनिधी): कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळणाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा आणि क्रांतीकारी टप्पा गाठला गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर यांना जोडणाऱ्या भव्य ‘केबल स्टेड’ (Cable-Stayed) पुलाचे काम पूर्ण झाले असून, आगामी पावसाळ्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या ऐतिहासिक प्रकल्पामुळे रत्नागिरी ते सातारा दरम्यानचे अंतर तब्बल ५० किलोमीटरने कमी होणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच या पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले. युती सरकारच्या काळात (मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना) प्रस्तावित असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अखेर मूर्त स्वरूप आले आहे.
वरळी सी-लिंकची आठवण करून देणारा भव्य प्रकल्प!
मुंबईतील प्रसिद्ध ‘वरळी सी-लिंक’च्या धर्तीवर पश्चिम महाराष्ट्रात उभारण्यात आलेला हा अशा प्रकारचा पहिलाच आधुनिक केबल स्टेड पूल आहे.
एकूण खर्च: सुमारे १७५ कोटी रुपये
लांबी व रुंदी: ५४० मीटर लांब आणि १४ मीटर रुंद
कनेक्टिव्हिटी: तापोळा ते कोकणच्या दिशेला गाढवली आहिर यादरम्यान उभारणी.
बांधकाम कंपनी: टी ॲण्ड टी (T & T)
वेळेची आणि इंधनाची मोठी बचत!
या पुलामुळे रत्नागिरीतून महाबळेश्वरला जाण्यासाठी पर्यटकांना आणि नागरिकांना ‘पोलादपूरचा आंबेनळी घाट’ पार करावा लागणार नाही. खेड तालुक्याच्या हद्दीवरील रघुवीर घाट मार्गे या नव्या ब्रिजवरून थेट तापोळा, कास पठार मार्गे सातारा गाठता येईल.
पर्यटकांसाठी मोठी पर्वणी: देशातील पहिली ‘कॅप्सूल लिफ्ट’ व्ह्यू गॅलरी!
हा पूल केवळ वाहतुकीचा मार्ग नसून पर्यटनाचे एक मोठे केंद्र बनणार आहे.
पुलाच्या मध्यभागी ४३ मीटर उंचीची भव्य ‘व्ह्यू गॅलरी’ उभारण्यात आली आहे.
या गॅलरीपर्यंत जाण्यासाठी पर्यटकांसाठी अत्याधुनिक ‘कॅप्सूल लिफ्ट’ आणि दोन्ही बाजूंनी पायऱ्यांची सुविधा असेल.
येथून पर्यटकांना कोयना धरणाचे विहंगम बॅकवॉटर, निसर्गरम्य परिसर, सूर्योदय आणि सूर्यास्ताचा विलोभनीय नजराणा अनुभवता येईल.
कोयना खोऱ्यात आणखी एक ३०० कोटींचा पूल!
दुर्गम कोयना आणि खांदाटी खोऱ्यातील नागरिकांचा पावसाळ्यातील धोकादायक ‘बार्ज’ (नाव) प्रवास कायमचा बंद होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव असलेल्या ‘दरे’ ते कोयना खोऱ्यातील ‘बामणोली’ गावाला जोडणाऱ्या आणखी एका ३०० कोटींच्या पुलाचे काम वेगात सुरू आहे. यासोबतच बामणोली ते आपटी दरम्यानही एक पूल उभारला जात आहे.
प्रशासकीय प्रतिक्रिया:
“कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या मुख्य पुलाचे काम आता पूर्ण झाले असून, व्ह्यू गॅलरीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या परिसरातील इतर तीन पुलांची कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत.”
— अजय देशपांडे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (महाबळेश्वर)
