Saturday, June 6, 2026

व्यावसायिक वादातून आठवडा बाजारात दुकानदाराला लोखंडी सळीने मारहाण; दोन आरोपींवर गुन्हा दाखल

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : शहरातील प्रसिद्ध आठवडा बाजार परिसरात व्यवसायिक वादातून एका कपडा व्यापाऱ्यावर लोखंडी सळीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘आमचे ग्राहक का तोडता?’ असे विचारल्याचा राग मनात धरून शेजारील दोन दुकानदारांनी मिळून हा हल्ला केला. या हल्ल्यात अनिल विसंबर यादव (वय ३०, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. कोकणनगर, रत्नागिरी) हे व्यापारी गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पप्पू आणि सुरेश (रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विचारणेचा आरोपींना प्रचंड राग आला : १६ मे रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास अनिल यादव आणि त्यांचे सहकारी आठवडा बाजारातील आपले कपड्यांचे दुकान बंद करत होते. दरम्यान, समोरच दुकान असलेले आरोपी पप्पू आणि सुरेश यांना यादव यांनी “तुम्ही आमचे ग्राहक का तोडता?” असा सहज प्रश्न विचारला. या साध्या विचारणेचा आरोपींना प्रचंड राग आला आणि त्यांनी दुकातील लोखंडी सळ्यांनी अनिल यादव यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांना अश्लील शिवीगाळ करत ‘ठार मारून टाकू’ अशी धमकी दिली आणि वाद सोडवण्यासाठी आलेल्या साक्षीदारांनाही लाथांनी बेदम मारहाण केली.

जखमी अनिल यादव यांच्यावर उपचार : या घटनेनंतर जखमी अनिल यादव यांच्यावर उपचार करण्यात आले असून, त्यांनी १७ मे रोजी सायंकाळी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पप्पू आणि सुरेश यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५१(३), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रत्नागिरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

शेअर करा

आणखी वाचा