सिंधुदुर्ग प्रतिनिधी : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे गृह खाते पूर्णतः अपयशी ठरले असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिसांकडून महिन्याला तब्बल २ कोटी रुपयांचा हप्ता थेट गृह खात्याला दिला जातो, असा खळबळजनक आरोप सत्ताधारी महायुतीतील शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता. सत्ताधारी आमदाराच्या याच विधानाचा धागा पकडत वैभव नाईक यांनी आता थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला असून, विरोधक आणि जनतेच्या आरोपांना आता सत्ताधाऱ्यांकडूनच पुष्टी मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वैभव नाईक पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असल्याचे स्वतः निलेश राणे यांनीच समोर आणले आहे. जर सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या दाव्यानुसार खरोखरच सिंधुदुर्ग पोलिसांकडून गृह खात्याला महिन्याला २ कोटी रुपयांची खंडणी किंवा हप्ता जात असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. नैतिकतेच्या आधारावर या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.
- या संपूर्ण प्रकरणावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांनाही जाहीर आव्हान दिले आहे. निलेश राणे यांनी केवळ हवेत आरोप करून थांबून राहू नये, तर आपल्या या गंभीर आरोपावर त्यांनी ठाम राहावे. गृह खात्याकडून या ‘२ कोटींच्या हप्त्या’चे नेमके उत्तर काय आहे, ते त्यांनी अधिकृतपणे वसूल करावे आणि पत्रकार परिषद घेऊन ते सत्य महाराष्ट्रातील जनतेसमोर उघड करावे, असे थेट आव्हानच नाईक यांनी राणेंना दिले आहे.
महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले : सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधकांकडून सातत्याने गृहखात्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच, आता सत्ताधारी आमदारानेच स्वतःच्याच सरकारमधील गृहखात्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्याने फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या वादावर आता गृह खाते किंवा भाजप नेते काय पडसाद उमटवतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
