Saturday, June 13, 2026

झिरो ॲक्सीडेंट ड्राईव्ह’: रत्नागिरी पोलीस दलाची रस्ते अपघातमुक्तीसाठी विशेष मोहीम; एका आठवड्यात ४०१ तळीरामांवर कारवाई

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील प्राणघातक रस्ते अपघातांचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष पावले उचलली जात आहेत. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली १ जून २०२६ पासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये “झिरो ॲक्सीडेंट ड्राईव्ह” ही व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच आठवड्यात (१ जून ते ८ जून २०२६) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार वाहनचालकांवर पोलिसांनी जोरदार बडगा उगारला आहे.  

वाहतूक पोलिसांची धडक कारवाई (१ ते ८ जून २०२६):

या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील विविध भागांत नाकाबंदी आणि तपासणी कडक करण्यात आली असून खालीलप्रमाणे ठोस कारवाई करण्यात आली आहे:  

मद्यपी वाहनचालक: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ४०१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली.  

अतिवेग (Over Speeding): वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या १७३ वाहनचालकांवर केसेस करण्यात आल्या आहेत.  

वाहतुकीस अडथळा: रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या १६२ प्रकरणांमध्ये कारवाई झाली.  

विना हेल्मेट: दुचाकी चालवताना सुरक्षेचा नियम धाब्यावर बसवून हेल्मेट न वापरणाऱ्या १० चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.  

संवेदनशील क्षेत्रांत सुरक्षेचे उपाय आणि ‘NHAI’ शी समन्वय:

केवळ दंडात्मक कारवाई न करता, अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या रस्ते रचनेमध्ये सुधारणा करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि इतर संबंधित विभागांशी समन्वय साधला आहे.  

महामार्ग आणि जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी रंबलर्स बसवण्यात आले आहेत.  

संभाव्य अपघात क्षेत्रे आणि संवेदनशील ब्लॅक स्पॉट्सवर सूचना फलक, वेगमर्यादा फलक व दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.  

जिल्ह्यातील मुख्य अपघाती प्रवण क्षेत्र समजल्या जाणाऱ्या हातखंबा (रत्नागिरी) आणि भोस्ते घाट (खेड) येथे विशेष वाहतूक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  

१८ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जनजागृतीचा धडाका:

रस्ते सुरक्षेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व १८ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष मोहीम राबवली जात आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचे नियम पटवून दिले जात असून, नागरिकांसोबत थेट संवाद सत्रे आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करून जनजागृती केली जात आहे.

पोलीस प्रशासनाचे आवाहन:

“रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे ‘झिरो अॅक्सिडेंट ड्राईव्ह’ अंतर्गत ही मोहीम यापुढेही अशीच प्रभावीपणे सुरू राहणार आहे. नागरिकांनी मद्यपान करून वाहन चालवणे टाळावे, वेगमर्यादेचे पालन करावे, दुचाकी चालवताना हेल्मेट व चारचाकी चालवताना सीट बेल्टचा वापर आवर्जून करावा. आपले जिल्हा रस्ते अपघातमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.”

शेअर करा

आणखी वाचा