आंबा (जि. कोल्हापूर) : परिसरातील ओझरे घाटात असणारी संरक्षण भिंत खचल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची तातडीने दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी रविवार दुपारपासून या घाटातील एसटी बससेवा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. यापूर्वी ३१ जुलैपासूनच घाटातील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली होती. मात्र, घाटातील धोका वाढल्याने आता प्रवासी बसची वाहतूकही पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. घाटातील रस्त्याची स्थिती सुधारत नाही आणि सुरक्षेची पूर्ण खात्री पटत नाही, तोपर्यंत अवजड वाहने व बससाठी ही बंदी कायम राहील, असे RTO आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
घाटातील बससेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पर्यायी वाहतूक मार्गांची घोषणा केली आहे. मुंबई-गोवा महामार्गाकडे जाणाऱ्या एसटी बसेसना गगनबावडा-तळेरे मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याशिवाय, कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी कोल्हापूर-बाजारभोगाव-अणुस्कुरा-पाचल-रत्नागिरी या पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्य मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने प्रवासाचा वेळ आणि अंतर वाढणार असले, तरी संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. सर्व वाहनचालकांनी आणि प्रवाशांनी अधिकृत पर्यायी मार्गांचाच अवलंब करावा, असे आवाहन RTO व एसटी महामंडळाने केले आहे.
दरम्यान, ओझरे खिंडीत खचलेल्या भिंतीच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना युद्धपातळीवर सुरू करण्यात आल्या आहेत. खचलेल्या भिंतीच्या बाजूला पत्रे लावून धोकादायक भाग झाकण्यात आला असून, तिथे तातडीने एक छोटी भिंत उभारण्यात आली आहे. या तात्पुरत्या बांधकामामुळे हलक्या वाहनांच्या प्रवासासाठी एक हंगामी आडोसा आणि सुरक्षा व्यवस्था निर्माण झाली आहे. घटनास्थळी पोलीस व बांधकाम विभागाचे पथक तैनात असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. हलक्या वाहनांची वाहतूक सुरक्षितपणे सुरू ठेवण्यासोबतच, घाटातील खचलेल्या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
