Thursday, September 3, 2026

दापोलीत सासूच्याच घरात जावयाने मारला ७.९० लाखांवर डल्ला; १२ तासांत पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

Date:

दापोली प्रतिनिधी : तालुक्यातील पालगड कातळवाडी येथे घर फोडून तब्बल ७ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. फिर्यादी शुभांगी विष्णू दळवी यांच्या घरातून हे दागिने चोरीला गेले होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, दापोली पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या १२ तासांत या घटनेचा छडा लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरी करणारा दुसरा कोणी नसून फिर्यादींचा जावई विजय जयराम नामुगडे (वय ३५) हाच असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोराने घराच्या मागील बाजूस असलेल्या स्वयंपाक घराच्या स्लायडिंग खिडकीतून घरात प्रवेश केला होता. त्यानंतर बेडरुममधील बेडवर ठेवलेल्या पिशवीतील दागिन्यांची पर्स चोरून नेण्यात आली. या पर्समध्ये सुमारे ४ लाख २० हजार रुपये किमतीचे ४२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, ७० हजार रुपये किमतीचा ७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, १ लाख ५० हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ५० हजार रुपये किमतीच्या तीन सोन्याच्या अंगठ्या आणि सुमारे १ लाख रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट असा एकूण ७ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल होता.

घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घरातील परिस्थिती, चोरीची पद्धत आणि उपलब्ध माहितीच्या आधारे तपास करत असताना पोलिसांना संशयित आरोपी विजय नामुगडे याच्यावर संशय निर्माण झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीकडून चोरीस गेलेला सर्वच्या सर्व ७.९० लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. अवघ्या १२ तासांत चोरीचा उलगडा करून आरोपीला जेरबंद केल्याबद्दल दापोली पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चोरी नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली होती, हे सोन्याचे दागिने कुठे नेण्यात आले होते आणि या गुन्ह्यात आरोपीला आणखी कोणाचा सहभाग होता का, या सर्व बाबींचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

शेअर करा

आणखी वाचा