Thursday, September 3, 2026

आरोग्य मंदिर परिसरात मंगळवारी मध्यरात्री झाला तुफान राडा, पिस्तूलसदृश हत्यार काढल्याने परिसरात भीती

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी  : शहरातील आरोग्य मंदिर परिसरात मंगळवारी मध्यरात्री एका चायनीज सेंटरबाहेर तुफान राडा झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात काही काळ प्रचंड खळबळ उडाली होती. कौटुंबिक वादातून आणि बहिणीने आपल्या मर्जीने लग्न केल्याच्या रागातून हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. संतप्त भावाने थेट चायनीज सेंटर गाठून तिथे जोरदार गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ‘माझ्या बहिणीला फूस लावलीस, तुला बघतोच’ अशी धमकी देत त्याने तेथे उपस्थित असलेल्यांशी वाद घातला. या वादाचे रुपांतर काही वेळातच अत्यंत तीव्र स्वरूपाच्या भांडणात झाले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे आरोग्य मंदिर परिसरातील व्यावसायिक आणि नागरिक पुरते घाबरून गेले होते.

बहिणीच्या विवाहाच्या रागातून भावाचे कृत्य : मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, उद्यमनगर-ओसवालनगर परिसरातील एका तरुणाच्या बहिणीने तिच्या पसंतीच्या मुलाशी विवाह केला होता. मात्र, या लग्नाला तिच्या भावाचा अत्यंत तीव्र विरोध होता. मंगळवारी संबंधित तरुणी अचानक घरी आली आणि स्वतःच्या कपड्यांची बॅग घेऊन घरातून निघून गेली. हा प्रकार पाहून भाऊ प्रचंड संतापला आणि त्याने त्याचा राग चायनीज सेंटर चालकावर काढण्याचे ठरवले. रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास तो तरुण आरोग्य मंदिरातील चायनीज सेंटरवर पोहोचला. तिथे पोहोचताच त्याने आरडाओरडा करत वादाला सुरुवात केली. काही क्षणांतच दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये जोरदार धक्काबुक्की आणि बाचाबाची सुरू झाली.

पिस्तूलसदृश हत्यार काढल्याने परिसरात भीती : भांडण सुरू असताना वातावरण अधिकच चिघळले आणि संतप्त झालेल्या तरुणाने अचानक पिस्तूलसदृश हत्यार बाहेर काढले. अचानक हत्यार बाहेर काढलेले पाहताच तेथे जमलेल्या उपस्थितांमध्ये भीतीचे प्रचंड सावट पसरले. पिस्तूल पाहून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घाबरलेल्या काही जणांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून काहींनी तातडीने या प्रकाराची माहिती रत्नागिरी शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणत संपूर्ण परिसराची नाकेबंदी आणि पाहणी केली.

पोलिसांची तपासणी अन् परस्परविरोधी गुन्हे दाखल : घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी संशयित वाहनाची झडती घेतली असता त्यात पिस्तूलसदृश हत्यार आढळून आले. सुरुवातीला ते खरे रिव्हॉल्व्हर असल्याचे वाटल्याने पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने तपास सुरू केला. मात्र, तज्ज्ञांकडून त्याची सखोल तपासणी केली असता ते खरे रिव्हॉल्व्हर नसून एअर रिव्हॉल्व्हर असल्याचे स्पष्ट झाले. ही एअरगन सहसा माकडे पळवून लावण्यासाठी वापरली जाते, अशी माहिती तपासात पुढे आली. या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंचे नागरिक आणि संबंधित व्यक्ती शहर पोलीस ठाण्यात उपस्थित होत्या. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून परस्परविरोधी एनसी (नॉन-कॉग्निजिबल) दाखल केली आहे. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

शेअर करा

आणखी वाचा