रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): जिल्ह्यातील अनैतिक मानवी व्यापार व वेश्या व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाकडून कडक पावले उचलली जात आहेत. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाली येथील ‘श्रद्धा सबुरी लॉज’वर छापा टाकून मोठी कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे महिला कक्ष व पोलिसांच्या पथकाने पंच आणि बोगस ग्राहकाच्या मदतीने ही धडक कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे बेकायदेशीर व्यवसाय चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
छाप्यादरम्यान लॉजमधील एका खोलीत गीता छबी थापा (वय ३९, मूळ नेपाळ, सध्या रा. मच्छीमार्केट, रत्नागिरी) ही महिला आढळून आली. तपासात सदर महिलेकडून इतर पीडित महिलांच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळावरून ग्राहकाकडून वेश्यागमनासाठी घेतलेली ₹२,००० रोख रक्कम, ₹५,००० किमतीचा मोबाईल व इतर साहित्य असा एकूण ₹७,१०० चा मुद्देमाल जप्त केला. संबंधित महिला आर्थिक लाभासाठी बाहेरून महिलांना बोलावून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १५७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता व अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी एलसीबीचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र पालवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शबनम मुजावर व त्यांच्या पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली. अवैध धंद्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
