Thursday, April 16, 2026

रत्नागिरीत गॅस एजन्सीमधील कामगारांचे काम बंद आंदोलन, व्यवस्थापन -कर्मचाऱ्यांमध्ये उफाळला वाद

Date:

रत्नागिरी, प्रतिनिधी : इराण – इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे व्यावसायिक सिलिंडरबाबत व्यावसायिकांचे हाल झालेले आहेत. त्यातच आता रत्नागिरी शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वितरणावरून गॅस एजन्सी व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात वाद निर्माण झाला आहे. गॅस एजन्सीच्या व्यवस्थापनाने केलेल्या तक्रारीच्या निषेधार्थ १४ कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे वितरणावर त्याचा परिणाम होत आहे.

सोमवारी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वितरण करताना ५ सिलिंडर चुकीच्या पद्धतीने वितरित केल्याचा आरोप कंपनी व्यवस्थापनाने केला आहे. तसेच, गोडाऊन कीपरने या सिलिंडरची अवैध पद्धतीने विक्री केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. त्यानंतर याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून नियमानुसारच पावती देऊन गॅसचे वितरण केल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर व्यवस्थापनाच्या भूमिकेबाबत आक्षेप घेतला आहे.

सोमवारच्या या सर्व प्रकारानंतर मंगळवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून संतप्त झालेल्या 14 कर्मचाऱ्यांनी बंद आंदोलन सुरू केले. आवाज पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला असेल जोपर्यंत या वादावर तोडगा निघत नाही तोपर्यंत कामावर परतणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. मात्र हा वाद लवकरात लवकर मिटविण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशी मागणी रत्नागिरी शहर वासियांमधून केली जात आहे.

शेअर करा

आणखी वाचा