राजापूर प्रतिनिधी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातिवले (ता. राजापूर) येथे पुन्हा एकदा टोल वसुली सुरू करण्याच्या हालचालींनी तालुक्यात संतापाचा वणवा पेटला आहे. “रस्ता अपूर्ण आणि सुविधा शून्य असताना टोल कशासाठी?” असा सवाल करत राजापूर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी आणि ग्रामस्थ गुरुवारी रस्त्यावर उतरले. स्थानिकांना या टोलमधून पूर्णपणे वगळण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
निकृष्ट काम आणि अपूर्ण सुविधांवरून संताप : सकाळपासूनच हातिवले टोल नाक्यावर तालुक्यातील विविध भागांतून नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर आंदोलकांनी ताशेरे ओढले. अनेक ठिकाणी रस्ता खचला असून उड्डाणपुलांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. सर्व्हिस रोड, बस स्टॉप, स्ट्रीट लाईट, वृक्षलागवड आणि पिकअप शेड यांसारख्या मूलभूत सुविधा कागदावरच असून, प्रत्यक्षात प्रवाशांना धूळ आणि खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. “निकृष्ट दर्जाचा रस्ता देऊन टोल वसुली करणे ही कोकणवासीयांची आर्थिक पिळवणूक आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सुरक्षेचा अभाव : महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या, त्यांना अद्याप पूर्ण मोबदला मिळालेला नाही. अनेक शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षांचे वहिवाटीचे रस्ते बंद झाले असून त्यांना पर्यायी मार्ग दिलेले नाहीत. तसेच, महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असतानाही तातडीने उपलब्ध होणारी रुग्णवाहिका, क्रेन, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहे यांसारख्या सुविधांचा मोठा अभाव असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्थानिकांच्या दैनंदिन जगण्यावर घाला : राजापूर तालुक्यातील नागरिकांना शाळा, महाविद्यालये, ग्रामीण रुग्णालय, न्यायालय आणि बाजारपेठेसाठी दिवसातून अनेक वेळा हातिवले मार्गावरून ये-जा करावी लागते. अशा वेळी प्रत्येक खेपेला टोल भरणे हे सर्वसामान्य नागरिक, नोकरदार आणि व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. दोन वर्षांपूर्वी जनतेच्या प्रखर विरोधामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीमुळे ही टोल वसुली थांबवण्यात आली होती, ती आता पुन्हा सुरू करणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
