Saturday, June 6, 2026

शिवतर-कोडबा धरण कामामुळे रस्ता खचला; ग्रामस्थांचा जलसमाधीचा इशारा!

Date:

खेड प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील शिवतर (ता. खेड) येथे ‘शिवतर-कोडबा’ धरणाचे काम करताना जलसंधारण विभागाने रस्त्याखालील माती चुकीच्या पद्धतीने काढल्याने शिवतर-नामदरेवाडी रस्ता दोनवेळा खचला आहे. जुलै २०२४ नंतर जून २०२५ मध्येही रस्ता खचल्याने या भागातील ७०-७५ घरांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने संरक्षक भिंत न बांधल्याने, संतप्त माजी सैनिकांसह ग्रामस्थांनी येत्या १५ ऑगस्ट २०२६ (स्वातंत्र्यदिनी) रोजी धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. एसटी बस सेवाही बंद झाल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत.

याप्रकरणी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. धरणाजवळ ७०० ते ८०० फूट लांबीची संरक्षक भिंत बांधणे गरजेचे असून, त्याबाबत जिल्हा जलसंधारण अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्थेचे सचिव सुनील मोरे यांनी केला आहे. पावसाळ्यात सर्पदंश किंवा प्रसूतीसारख्या आपत्कालीन स्थितीत रस्ता नसल्याने रुग्णांना ‘डोली’ करून न्यावे लागणार आहे. प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास स्वातंत्र्यदिनी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

शेअर करा

आणखी वाचा