चिपळूण विशेष प्रतिनिधी : रामपूर-आवटेवाडी परिसरातील घनदाट जंगलात मानवी हाडे, दोन अंगठ्या आणि कृत्रिम दात सापडल्याने संपूर्ण चिपळूण तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या या पुराव्यांमुळे हा प्रकार ‘नरबळी’चा तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात असून, पोलीस आता ‘बुवाबाजी’च्या अँगलनेही तपास करत आहेत.
धक्कादायक पुरावे आणि गूढ वाढले
मानवी वस्तीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका आंबा बागेच्या परिसरात हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी पोलिसांना केवळ छोटी हाडेच नव्हे, तर तपासाला वेगळी दिशा देणाऱ्या पुढील वस्तू सापडल्या आहेत: दोन अंगठ्या आणि चार कृत्रिम दात (एकत्र जोडलेले). पूर्णपणे जळलेल्या बॅगेचा तुकडा.
लोखंडी साहित्य, एक छोटी चावी आणि लोखंडी स्क्रू.
हे सर्व साहित्य जळालेल्या अवस्थेत असल्याने, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
नेपाळी मजुरांची चौकशी; महिनाभरापासून दबली होती चर्चा
या भागात काम करणाऱ्या तीन नेपाळी आणि एका स्थानिक मजुराची पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महिनाभरापूर्वीच या मजुरांच्या नजरेस हा प्रकार आला होता. मात्र, प्रचंड भीतीपोटी त्यांनी ही माहिती कोणालाही दिली नाही. अखेर आंबा बागेच्या मालकांना याची कुणकुण लागताच हे भयंकर वास्तव समोर आले.
तपासाची चक्रे फिरली: कोल्हापूर प्रयोगशाळेकडे डोळे:
सापडलेली हाडे नेमकी मानवी आहेत की अन्य कोणाची, हे स्पष्ट करण्यासाठी ती तातडीने कोल्हापूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (Forensic Lab) पाठवण्यात येणार आहेत. हाडे ३ ते ४ महिने जुनी असावीत असा अंदाज आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.
