रत्नागिरी प्रतिनिधी – आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या समाप्तीला आता अवघे काही तास उरले असताना, रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. मंगळवारी, ३१ मार्च रोजी महावीर जयंतीची सार्वजनिक सुट्टी असल्याने, तांत्रिकदृष्ट्या आजचा सोमवार हाच या आर्थिक वर्षातील कामकाजाचा शेवटचा दिवस ठरला आहे. त्यामुळे वर्षभर केलेल्या विकासकामांचा हक्काचा निधी आज तरी पदरात पडणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
रस्ते आणि पुलांची १३० कोटींची बिले लटकली : जिल्ह्यातील रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांची अनेक महत्त्वाची कामे वर्षभरात पूर्ण झाली आहेत. मात्र, या कामांची बिले अद्याप प्रशासकीय स्तरावर प्रलंबित आहेत. जिल्ह्याला अपेक्षित असलेल्या निधीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ५ कोटी रुपयांचा अत्यल्प निधी प्राप्त झाला आहे. विशेषतः रस्ते व पूल बांधकामासाठी (लेखाशीर्ष ५०-५४) सुमारे १३० कोटी रुपयांच्या निधीची तातडीची आवश्यकता आहे. मात्र, वर्षाचा शेवटचा दिवस उजाडला तरी या हेडखाली अद्याप छदामही उपलब्ध झालेला नाही.
‘लाडकी बहीण’ आणि कर्जाच्या बोजामुळे निधीला कात्री? : स्वतःच्या खिशातून पैसे उभे करून कामे पूर्ण करणाऱ्या ठेकेदारांची अवस्था सध्या बिकट झाली आहे. राज्य सरकारवरील वाढता कर्जाचा बोजा आणि ‘लाडकी बहीण’ सारख्या मोठ्या सामाजिक योजनांवरील खर्चामुळे विकासकामांच्या निधीला कात्री लागल्याची चर्चा कंत्राटदारांमध्ये रंगली आहे. रविवारी बँकिंग व्यवहार बंद असल्याने सोमवारच्या दिवसावरच सर्वांच्या शेवटच्या आशा टिकून होत्या.
कामगारांचे पगार आणि साहित्याचे देणे कसे देणार? : आज दिवसभरात निधी न आल्यास कोट्यवधींची बिले ‘लॅप्स’ होण्याची किंवा पुढील आर्थिक वर्षापर्यंत लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. यामुळे कामगारांचे पगार आणि साहित्याचे देणे कसे फेडायचे, असा यक्षप्रश्न ठेकेदारांसमोर उभा ठाकला आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच रत्नागिरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर ठेकेदारांची मोठी गर्दी होण्याची चिन्हे आहेत.
