रत्नागिरी प्रतिनिधी : “एक पाऊल आर्थिक सक्षमतेकडे..!” या आपल्या ब्रीदवाक्याने सुरू झालेला प्रवास आज केवळ एक संस्था म्हणून नाही, तर आपल्या सर्वांच्या विश्वासाचा, कष्टांचा आणि एकतेचा जिवंत इतिहास बनला आहे. २०१८ साली एका छोट्याशा स्वप्नातून सुरू झालेली ही पतसंस्था आज हजारो सभासदांच्या आयुष्याशी जोडली गेली आहे. या प्रवासात अनेक चढ-उतार आले, कोविडसारख्या कठीण संकटांचा सामना करावा लागला, पण प्रत्येक वेळी आपण सर्वांनी एकत्र उभं राहून या संस्थेला पुढे नेलं, हीच आपली खरी ताकद आहे, त्यामुळेच २०२५-२६ आर्थिक वर्षात ३८ लाख निव्वळ नफा झाला, असे प्रतिपादन खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी केले.
३१ मार्च २०२६ अखेर संस्थेचा एकत्रित व्यवसाय ४० कोटी १७ लाखांपर्यंत पोहोचला आहे. ठेवी २३ कोटी ८९ लाख, कर्ज वितरण १६ कोटी २८ लाख, आणि गुंतवणूक ९ कोटी ४४ लाख इतकी झाली आहे. पण हे केवळ आकडे नाहीत, हे आहेत आपल्या विश्वासाचे प्रतिबिंब, आपल्या कष्टांचे फळ आणि आपल्या एकतेचे यश. ९७.२०% वसुली, ३८ लाखांहून अधिक निव्वळ नफा, आणि अत्यल्प १.८४% नेट NPA हे दाखवतात की आपण फक्त वाढलो नाही, तर योग्य मार्गाने, प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्धपणे वाढलो आहोत.
व्यवसाय वृद्धीचा विचार करता, खेळते भांडवल २४.१७% ने वाढले. स्वनिधी २१.४७% ने वाढला. ठेवी २५.०३% ने वाढल्या, कर्ज वितरण ३२.५८% ने वाढले. गुंतवणूक ११.९१% ने वाढली. निव्वळ नफा १७.९६% ने वाढला. ही प्रगती आपल्या सर्वांच्या एकजुटीचा आणि परिश्रमांचा परिणाम आहे. गेल्या सात वर्षांत संस्थेने सातत्याने वर्धिष्णू आर्थिक वाटचाल करत सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आजच्या स्पर्धात्मक आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीतही संस्था आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि ग्राहकाभिमुख सेवा जपत पुढे जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, शाखा विस्तार, आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य देत संस्था सर्वांना विश्वासार्ह आर्थिक सेवा देत आहे. गेल्या सात वर्षांचा विचार केला, तर ही वाटचाल केवळ आर्थिक प्रगतीची नाही, तर सहकाराच्या संस्कारांची आहे. मला अभिमान वाटतो की, या संस्थेच्या माध्यमातून आपण समाजातील अनेक कुटुंबांना आर्थिक आधार दिला, त्यांच्या स्वप्नांना बळ दिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा आनंद पाहिला. आपल्या सर्वांच्या निःस्वार्थ सहकार्यामुळेच आज ही संस्था सक्षम, स्थिर आणि विश्वासार्ह बनली आहे, असे पावरी म्हणाले.
