Saturday, June 6, 2026

महाराष्ट्रावर सूर्य कोपला! पुढचे 12 तास धोक्याचे, तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Date:

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानाचा पॅटर्न बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अवकाळी पावसाचा धोका काहीसा कमी झाला असला तरी आता राज्यावर उष्णतेच्या लाटेचे संकट घोंगावत आहे. 27 एप्रिलसाठी हवामान विभागाने धोक्याचा इशारा देत विविध भागांसाठी अलर्ट जारी केला आहे. विशेषतः विदर्भात प्रखर उष्णतेची लाट धडकणार असून काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. तर कोकण विभागात उष्ण दमट हवामानामुळे उकडा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. 

कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव

कोकण विभागात उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहणार आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. दमट वातावरणामुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी पाणी पुरेसे पिणे आणि उन्हात अनावश्यक फिरणे टाळणे आवश्यक आहे.

पश्चिम महाराष्ट्रात हवामान कोरडे आणि स्वच्छ

पश्चिम महाराष्ट्रात हवामान कोरडे आणि स्वच्छ राहील, मात्र तापमानात पुन्हा वाढ होणार आहे. दिवसाचे तापमान 38 ते 42 अंशांपर्यंत पोहोचू शकते, तर रात्रीचे तापमानही 22 ते 26 अंशांच्या दरम्यान राहणार आहे. दिवस-रात्र उष्णतेचा प्रभाव जाणवणार असल्याने उकाड्याचा त्रास वाढू शकतो.

मराठवाड्यात अवकाळीचा धोका टळला

मराठवाड्यात अवकाळी पावसाचा धोका टळला असला तरी उन्हाची तीव्रता वाढणार आहे. हवामान पूर्णपणे कोरडे राहणार असून तापमानाचा पारा 39 ते 43 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. रात्रीचे तापमान 23 ते 27 अंशांपर्यंत राहील. पुढील काही दिवस पावसाची कोणतीही शक्यता नसून उष्णतेचा जोर कायम राहील.

विदर्भात ऑरेंज अलर्ट

विदर्भात मात्र परिस्थिती अधिक गंभीर आहे. सोमवारी उष्णतेची लाट येणार असून अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि बुलढाणा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात तापमान झपाट्याने वाढून आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सोमवारी पावसाची शक्यता नसली तरी मंगळवारपासून पुन्हा अवकाळी पावसाचे संकेत मिळत आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील उष्णतेचा पारा चढलेलाच

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्येही उष्णतेचा पारा चांगलाच चढलेला आहे. या भागात हवामान कोरडे आणि उष्ण राहणार असून कमाल तापमान 39 ते 43 अंशांपर्यंत जाईल. उष्णतेचा चटका नागरिकांना जाणवेल आणि पावसाची कोणतीही शक्यता सध्या नाही.

उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता

महाराष्ट्रात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, हलके आणि सैल कपडे परिधान करावेत तसेच शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये याची काळजी घ्यावी. येत्या काही दिवसांत उष्णतेचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता असल्याने सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.

शेअर करा

आणखी वाचा