Saturday, June 6, 2026

रत्नागिरी : आरे-वारे किनाऱ्यावर महाकाय व्हेल माशाचा थरार; मासा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी!

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : कोकणच्या निसर्गसौंदर्याचा मानबिंदू असलेल्या रत्नागिरीतील प्रसिद्ध आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर रविवारी एका महाकाय व्हेल माशाचा मृतदेह वाहून आल्याने खळबळ माजली आहे. लाटांच्या तालावर तरंगणारा हा अवाढव्य मासा पाहण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांनी किनाऱ्यावर एकच गर्दी केली होती.

नेमकी घटना काय? : रविवारी (२६ एप्रिल) सायंकाळच्या सुमारास आरे-वारे परिसरातील काजीरभाटी किनाऱ्यालगत स्थानिक नागरिकांना समुद्रात काहीतरी मोठी वस्तू तरंगताना दिसली. जवळ जाऊन पाहिल्यावर तो एक मृत व्हेल मासा असल्याचे स्पष्ट झाले. समुद्राच्या उधाणामुळे हा मृतदेह हळूहळू किनाऱ्याच्या दिशेने सरकत होता. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि काही वेळातच बघ्यांची मोठी झुंबड उडाली.

वन विभागाकडून पाहणी : घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि कांदळवन कक्षाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, माशाचा आकार प्रचंड मोठा असल्याने आणि तो सध्या पाण्यातच अडकलेला असल्याने त्याला बाहेर काढण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत.

“सध्या हा मासा पाण्यात असून त्याला बाहेर काढणे अशक्य आहे. समुद्राला भरती आल्यानंतर लाटांच्या प्रवाहाने हा मृतदेह पूर्णपणे किनाऱ्यावर येईल, याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. त्यानंतरच पुढील कार्यवाही करता येईल.”

— कांदळवन अधिकारी

मृत्यूचे गूढ कायम : सागरी विश्वातील हा राजा नेमका कशामुळे दगावला, याचे गूढ अद्याप कायम आहे. या संदर्भात तज्ज्ञांकडून विविध तर्क लावले जात आहेत: समुद्रात वाढणारे प्लास्टिक आणि रासायनिक प्रदूषण, एखाद्या मोठ्या जहाजाची धडक बसल्याने झालेली दुखापत, वाढते वय किंवा गंभीर आजार यापैकी नेमक्या कोणत्या कारणाने या माशाचा मृत्यू झाला याबाबत चर्चेला उधाण आल्या आहे.

सागरी जीवांचा प्रश्न ऐरणीवर : कोकण किनारपट्टीवर गेल्या काही वर्षांत व्हेल, डॉल्फिन आणि कासवे मृत अवस्थेत आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. या ताज्या घटनेमुळे सागरी जीवांच्या सुरक्षिततेचा आणि बदलत्या समुद्री पर्यावरणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वन विभाग आता हा मृतदेह किनाऱ्यावर लागल्यानंतर त्याचे शवविच्छेदन करून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करणार आहे.

शेअर करा

आणखी वाचा