रत्नागिरी प्रतिनिधी : कोकणची ‘लाईफलाईन’ समजल्या जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या १५ वर्षांपासून रखडलेलेच आहे. चिपळूण शहरातून जाणारा महामार्गावरील सर्वात लांब उड्डाणपूल पावसाळ्यापूर्वी वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. मात्र, गेली पाच वर्षे सुरू असलेले हे काम अद्यापही अपूर्ण असून, सद्यस्थिती पाहता हा पूल मार्गी लागण्यासाठी आणखी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तसेच संगमेश्वर ते लांजा पर्यंतच्या महामार्गाच्या दोन टप्प्यातील काम अद्यापही काही प्रमाणात अपूर्णच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्याचा मुहूर्त यावेळी चुकणार असल्याची स्पष्ट स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे जिल्हावासियांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.
महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे यंदाच्या पावसाळ्यातही चिपळूणवासीय आणि प्रवाशांना भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. पावसाळ्यात रस्ते खराब झाल्यामुळे आणि पुलाचे काम अर्धवट असल्याने या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक वर्षांपासूनचा हा वनवास कधी संपणार, असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून विचारला जात आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल, अशी घोषणा केली असली तरी, रत्नागिरी जिल्ह्यातील कामाची ‘कासवगती’ पाहता ही मुदत पाळणे अशक्य असल्याचे चित्र आहे. जाणकारांच्या मते, सध्या ज्या वेगाने काम सुरू आहे, ते पाहता मंत्र्यांनी दिलेली नवी तारीखही केवळ ‘तारीख पे तारीख’ ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गाचे काम दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाले असून तिथे वाहतूक सुरळीत सुरू आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या टप्प्यांवरील कामे अद्यापही रखडलेली आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सुरू झालेला हा प्रकल्प गेली १२ वर्षे भाजप सरकारच्या कार्यकाळातही पूर्णत्वास जाऊ शकलेला नाही, ही वस्तुस्थिती समोर येत आहे.
देशातील इतर अनेक राष्ट्रीय महामार्गांची कामे विक्रमी वेळेत पूर्ण होत असताना, मुंबई-गोवा महामार्गाचे नशीब मात्र १५ वर्षांनंतरही बदललेले नाही. वारंवार मिळणाऱ्या आश्वासनांमुळे कोकणी माणसाचा संयम आता सुटत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ तारखा न देता आता ठोस पावले उचलून हे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी तीव्र मागणी जनतेतून होत आहे.
