Saturday, June 6, 2026

रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई: कोल्हापूरहून येणारा ६.७७ लाखांचा गुटखा जप्त; एक अटकेत

Date:

रत्नागिरी खबरबात टीम : शहरात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध रत्नागिरी पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. आज पहाटे करण्यात आलेल्या एका मोठ्या कारवाईत पोलिसांनी सुमारे ६ लाख ७७ हजार ९०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून कोल्हापूरच्या एका तस्कराला बेड्या ठोकल्या आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा : कोल्हापूर येथून मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा विक्रीसाठी रत्नागिरीत येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी तातडीने कारवाईचे नियोजन केले.

पहाटेची थरारक कारवाई : पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने शहरात सापळा रचला होता. पहाटेच्या सुमारास संशयास्पद वाहनाची झडती घेतली असता हा अवैध साठा उघड झाला.

कारवाईचा तपशील:

अटक केलेला आरोपी: शरद गणपती भंडारे (वय – , रा. सरूड, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर)

जप्त गुटखा व पान मसाला: ३,२७,९०४ रुपये.

जप्त वाहन: ३,५०,००० रुपये किमतीची मारुती इको कार.

एकूण मुद्देमाल: ६,७७,९०४ रुपये.

तपास सुरू : याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गुटखा रत्नागिरीत कोणाला पुरवला जाणार होता, याचे धागेदोरे पोलीस शोधत आहेत. पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या धडक कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या सतर्कतेचे शहरात कौतुक होत आहे.

शेअर करा

आणखी वाचा