रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. केवळ खर्चासाठी मागितलेले पैसे दिले नाहीत या रागातून एका २१ वर्षीय मुलाने आपल्या वडिलांना बेदम मारहाण करत धक्काबुक्की केली. या झटापटीत वडील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
वडिलांकडे २००० रुपयांची मागणी : मिळालेल्या माहितीनुसार, ५३ वर्षीय मनोज प्रभाकर सणस हे कुकिंगचा व्यवसाय करतात. २५ एप्रिल रोजी सायंकाळी कुवारबांव येथील एका पडक्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ते आपला मुलगा प्रणय सणस याच्यासोबत बसले होते. यावेळी प्रणयने वडिलांकडे २००० रुपयांची मागणी केली. मात्र, वडिलांनी असमर्थता दर्शवत केवळ २०० रुपये देऊ शकतो असे सांगताच मुलाचा संयम सुटला आणि वादाला सुरुवात झाली.
पैसे देण्यास नकार: वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या प्रणयने त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून गेला. त्याने केलेल्या जोराच्या धक्काबुक्कीमुळे मनोज सणस यांचा तोल गेला आणि ते थेट दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळले. या भीषण पडझडीत त्यांच्या शरीराला गंभीर दुखापत झाली. धक्कादायक बाब म्हणजे, वडील जखमी अवस्थेत खाली पडलेले असतानाही मुलगा त्यांना सोडून निघून गेल्याचे समोर आले आहे.
जखमी मनोज सणस रात्रभर वेदनेने विव्हळत होते : जखमी मनोज सणस रात्रभर वेदनेने विव्हळत त्याच ठिकाणी पडून होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या मित्राला मदतीसाठी बोलावले, त्यानंतर त्यांना १०८ रुग्णवाहिकेने तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्ताच्या नात्याला विसरून क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या या मुलावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली असून, सध्या जखमी वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
