Saturday, June 6, 2026

लांजाच्या सुपुत्रांचा राज्यस्तरावर डंका! तायक्वॉंदो स्पर्धेत सुवर्णासह कांस्य पदकाची कमाई

Date:

लांजा प्रतिनिधी :  विरार येथे संपन्न झालेल्या ‘व्हिक्टरी क्लब ६ वी महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वॉंदो चॅम्पियनशिप २०२६’ मध्ये लांजा तालुक्यातील खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर उत्तुंग यश संपादन केले आहे. लांजा येथील गुरुकुल तायक्वॉंदो स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीच्या दोन खेळाडूंनी या राज्यस्तरीय स्पर्धेत पदकांची लयलूट करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

दिनांक २८ व २९ एप्रिल रोजी पार पडलेल्या या भव्य स्पर्धेत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून खेळाडू सहभागी झाले होते. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत लांजाच्या खेळाडूंनी आपल्या आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले.

विजेते खेळाडू आणि त्यांची कामगिरी:

विघ्नेश विनोद दिवाळे: याने आपल्या वजनी गटात प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आणि अव्वल स्थान प्राप्त केले.

आराध्य कमलाकर सावंत: याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक (Bronze Medal) मिळवून यश संपादन केले.

या दोन्ही खेळाडूंना प्रशिक्षिका शितल विरेंद्र आचरेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणामुळेच हे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.

सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव : या यशस्वी कामगिरीबद्दल तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. व्यंकटेश कर्रा, सचिव लक्ष्मण कर्रा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, कोषाध्यक्ष शशांक घडशी यांनी खेळाडूंचे कौतुक केले.

तसेच लांजा अकॅडमीचे अध्यक्ष श्री. किशोर यादव, मार्गदर्शक परशुराम मासये, उपाध्यक्ष अमोल रेडीज, सहसचिव अनुजा कांबळे, सदस्य रोहित कांबळे, राष्ट्रीय पंच तेजस्विनी आचरेकर, प्रमुख प्रशिक्षक तेजस पावसकर, गौरव खेडकर, गणेश तोंडारे, तेजस वडवलकर आणि योगेश तोंडारे यांच्यासह सर्व खेळाडू व पालकांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

“ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये मोठी जिद्द असते. विघ्नेश आणि आराध्य यांनी कडाक्याच्या स्पर्धेत मिळवलेले हे यश लांजा तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे.” अशी भावना क्रीडाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

शेअर करा

आणखी वाचा