९४.१४ टक्के निकालासह रत्नागिरी-सिंधुदुर्गचा दबदबा कायम; मुलींनी पुन्हा मारली बाजी
रत्नागिरी/सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत कोकण विभागीय मंडळाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ९४.१४ टक्के निकाल लावत कोकण बोर्डाने सलग १५ व्या वर्षी राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. विशेष म्हणजे, २०१२ मध्ये या स्वतंत्र बोर्डाची स्थापना झाल्यापासून अव्वल स्थान टिकवून ठेवण्याची ऐतिहासिक परंपरा यंदाही कायम राखण्यात बोर्डाला यश आले आहे.
मुलींचे वर्चस्व कायम : यंदाच्या निकालातही दरवर्षीप्रमाणे मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून येत आहे. कोकण विभागातून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.७८ इतकी असून मुलांची टक्केवारी ९१.५३ आहे. म्हणजेच मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ५.२५ टक्क्यांनी अधिक आहे.
सिंधुदुर्गची आघाडी : जिल्ह्यानिहाय निकालात सिंधुदुर्ग जिल्ह्याने ९५.९४ टक्के निकालासह बाजी मारली आहे, तर रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९३.१८ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात २.६ टक्क्यांची किंचित घट झाली असली, तरी राज्यातील इतर नऊ विभागांच्या तुलनेत कोकण बोर्डाने आपले अव्वल स्थान अढळ ठेवले आहे.
पारदर्शक आणि ‘कॉपीमुक्त’ परीक्षा : बोर्डाच्या वतीने राबवण्यात आलेल्या ‘कॉपीमुक्त अभियान’ आणि सीसीटीव्ही निगराणीखालील परीक्षा या उपक्रमांमुळे केंद्रांवर एकही गैरप्रकार घडला नाही. विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाचाही या यशात मोठा वाटा आहे.
“हे यश म्हणजे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या एकत्रित कष्टांचे फळ आहे. निकालात पारदर्शकता आणण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर आणि ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ यांसारख्या उपक्रमांचा मोठा फायदा झाला.”
— राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष.
निकाल : एका नजरेत (कोकण विभाग) टक्केवारी / संख्या
एकूण निकाल ९४.१४ %
सिंधुदुर्ग जिल्हा ९५.९४ %
रत्नागिरी जिल्हा ९३.१८ %
मुलींचा निकाल ९६.७८ %
मुलांचा निकाल ९१.५३ %
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी २१,५४८
शाखानिहाय कामगिरी:
विज्ञान: ९७.५३% (अव्वल)
व्यावसायिक शिक्षण: ९४.१३%
वाणिज्य: ९३.९२%
कला: ८८.६२%
तंत्रज्ञान: ८६.८८%
महत्वाची सूचना:
ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी आहे, ते ३ मे ते १७ मे २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात. पुनर्मूल्यांकनासाठी आधी छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.
