रत्नागिरी प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी येथील पोलीस परेड ग्राऊंडवर मुख्य शासकीय सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. रत्नागिरीचा विकास हा महाराष्ट्र राज्याच्या संस्कृतीला आणि परंपरेला साजेसा केला जात असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जनतेने या विकासकामांना साथ द्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
या मुख्य शासकीय सोहळ्याला पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी यावेळी परेडचे निरीक्षण करून पथकाकडून मानवंदना स्वीकारली.
जिल्ह्यातील पायाभूत सुविधांबाबत माहिती देताना डॉ. सामंत म्हणाले की, रत्नागिरी विमानतळ आता उड्डाणासाठी सज्ज झाले असून रेल्वे स्थानकाचेही आधुनिकीकरण केले जात आहे. प्रशासकीय कामांसाठी १०० कोटी रुपये खर्चून नवीन इमारत पूर्णत्वास येत असून, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या इमारतींचे कामही पूर्ण झाले आहे. तसेच, १६९ कोटी रुपये खर्चून पोलीस दलासाठी भव्य इमारत उभारली जात आहे. पर्यटन वाढीसाठी आरेवारे किनाऱ्यावर ५ कोटी रुपयांचे ‘इको ट्युरिझम’ केंद्र डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शैक्षणिक क्षेत्रात रत्नागिरीने घेतलेल्या भरारीचे पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला ‘नासा-इस्त्रो अभ्यास दौरा’ आता संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच, रत्नागिरीत केंद्रीय विद्यालयासाठी नाचणे येथे अडीच हेक्टर जागा मंजूर करण्यात आली असून, यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक वैभवात भर पडणार आहे. पाच मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ३ कोटी रुपये खर्चून ‘संविधान भवन’ उभारले जात असून, तिथे एमपीएससी आणि यूपीएससी स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी राबवलेल्या योजनांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्याचा विकास आराखडा २९ कोटींनी वाढवून देण्यात आला आहे. नमो किसान योजना आणि फळपीक विम्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या दोन-तीन महिन्यात त्याचे लोकार्पण केले जाईल. रत्नागिरी जिल्हा प्रशासन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात राज्यात अग्रेसर असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
