रत्नागिरी प्रतिनिधी : स्थानिक कामगार कल्याण केंद्र, रत्नागिरी येथे १ मे ‘कामगार दिन’ आणि ‘महाराष्ट्र दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील निजामपुरकर इमारतीतील कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात कामगारांच्या विविध समस्या आणि केंद्राच्या नवीन इमारतीचा प्रश्न प्रामुख्याने चर्चिला गेला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश लिमये होते. केंद्राच्या संचालिका सौ. पूजा सागर नागवेकर यांनी यावेळी प्रास्ताविक करताना सांगितले की, गेली ५० वर्षे हे कार्यालय भाड्याच्या आणि जुन्या इमारतींमध्ये कार्यरत असून, कामगारांच्या कुटुंबांसाठी विविध प्रशिक्षण सुविधा देण्यासाठी स्वतंत्र व हक्काची नवीन इमारत व्हावी, यासाठी उद्योगमंत्री तथा पालकमंत्र्यांकडे लेखी निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
कामगार पेन्शनसाठी लढा तीव्र करणार : कामगार नेते संजय नागवेकर यांनी यावेळी ईपीएस ९५ पेन्शनधारकांच्या प्रश्नावर प्रकाश टाकला. कामगारांना हक्काची १५ हजार रुपये पेन्शन मिळावी, यासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनापासून ते मंत्री-खासदारांच्या भेटीपर्यंत केलेल्या संघर्षाची माहिती त्यांनी दिली. केवळ आश्वासने नको तर प्रत्यक्ष कृती हवी, अशी भूमिका मांडतानाच त्यांनी निवृत्त प्राथमिक शिक्षकांना मिळवून दिलेल्या न्यायाच्या अनुभवावरून हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. या मागणीला उपस्थित सर्व मान्यवरांनी जाहीर पाठिंबा दर्शवला.
प्रशासकीय कामात लोकसहभागाची साथ : रत्नागिरी कामगार कल्याण केंद्राचा भार एकट्या सांभाळताना संचालिका सौ. पूजा नागवेकर यांना स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. यावेळी समाजभूषण सुरेंद्र घुडे यांनी कामगारांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “देश आणि राज्याची आर्थिक प्रगती कामगारांच्या घामावर उभी आहे. नवीन इमारतीसाठी निवेदने देताना आम्ही सोबत होतो आणि यापुढेही कायम राहू,” असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच श्रीमती निधी सावंत यांनी केंद्राच्या कार्याचा आढावा घेत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि केंद्राला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे मान्य केले.
नव्या इमारतीचा संकल्प आणि आभार : कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश लिमये यांनी आपल्या ९० व्या वर्षातील पदार्पणाचा अनुभव सांगताना, कामगार कार्यालयाची नवीन इमारत आणि प्रलंबित निवृत्ती वेतन यांसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला अविनाश गवंडे, सुरेंद्र शेट्ये, अमृता शेट्ये, मानवी कदम, तेजा पाडळकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेवटी, संचालिका सौ. पूजा नागवेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. सर्वांच्या सहकार्यामुळे कामगार कल्याणाचे काम पुढे नेण्यासाठी नवा उत्साह मिळाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
