Saturday, June 6, 2026

भीषण अपघात: खेडमध्ये उभ्या लक्झरी बसला कारची जोरदार धडक; ५ प्रवासी गंभीर जखमी

Date:

खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी पहाटे मृत्यूने थैमान घातले. खेड तालुक्यातील भरणे नाका येथे महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या एका खाजगी लक्झरी बसला भरधाव मारुती स्विफ्ट कारने पाठीमागून भीषण धडक दिली. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात कारमधील पाच प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

मुंबईहून सावर्डेच्या दिशेने पाच प्रवासी घेऊन निघालेली मारुती स्विफ्ट कार पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास भरणे नाका परिसरात पोहोचली. यावेळी चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या लक्झरी बसवर ही कार पाठीमागून जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला.

कारचा चक्काचूर, प्रवाशांना काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न : धडकेमुळे स्विफ्ट कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारचा पुढचा भाग बसच्या खाली घुसल्याने प्रवासी आतमध्ये अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.

बचाव पथक : मदत ग्रुपचे प्रसाद गांधी, जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज संस्था आणि १०८ रुग्णवाहिका पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. भाजपचे वैभव खेडेकर, स्थानिक नागरिक आणि खेड पोलिसांनी सुमारे पाऊण तास अथक प्रयत्न करून गाडीचे पत्रे कापून जखमींना बाहेर काढले.

जखमींची नावे आणि सद्यस्थिती : अपघातातील जखमींना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची मिळालेली नावे खालीलप्रमाणे आहेत:

परशुराम खराडे

अनुज चाकळे

मनीषा परशुराम स्मारे

प्रतिक्षा खराडे

शिल्पा खराडे 

“अपघात इतका गंभीर होता की कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. सर्व जखमींना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.”

वाहतुकीवर परिणाम : या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली आहे. पहाटेच्या वेळी चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

शेअर करा

आणखी वाचा